ऊस तोडावा तसे हातावर वार, कोयत्याचे २० घाव; चार दिवसांपूर्वीच जेलमधून सुटका, पुण्याच्या कोर्टाबाहेर मंदार किवळेचा मृत्यू


पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर भरदुपारी गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. मंदार मारुती किवळे याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला आणि त्यानंतर मंदारवर कोयत्याने हल्ला केला. जवळपास एक मिनिट हा हल्ला सुरू होता. घटनेची माहिती मिळताच न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.

घटनेनंतर क्राइम ब्रँचचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

नेमकं काय आहे हल्ल्यामागचं कारण?

२० एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे जमिनीच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणात मंदार मारुती किवळे आरोपी होता. चार दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी आला असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. मंदार हा मूळचा कात्रज येथील रहिवासी होता.

भरदिवसा आणि न्यायालयासारख्या वर्दळीच्या ठिकाणी गोळीबारासह झालेल्या या हल्ल्यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!