ब्रेकिंग! पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर गोळीबार करून कोयत्याने सपासप वार, व्हिडिओ व्हायरल, घटनेने पुणे हादरले…

पुणे : विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज गुन्हेगारीचे आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे, ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी बाब आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात आज भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले.
ही घटना पुणेकरांच्या आणि एकंदरीत शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. न्यायालय हे सर्वसामान्य माणसासाठी ‘न्यायदानाचे मंदिर’ असते. जिथे प्रत्येक नागरिक न्यायाच्या आणि संरक्षणाच्या अपेक्षेने येतो, त्याच पवित्र वास्तूच्या परिसरात जर भरदिवसा रक्ताचा सडा पडत असेल, तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे पाहायचे? विशेष म्हणजे, या परिसरात पोलीस चौकी आहे, सुरक्षा बंदोबस्त आहे आणि पोलिसांची सततची वर्दळ असते.

तरीही भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि खून करण्याची हल्लेखोरांची हिंमत होतेच कशी? गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते. गेल्या काही काळापासून पुण्यात कोयता गँगची दहशत, गोळीबाराच्या घटना, भररस्त्यात होणारे खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज पुण्यात शिल्लक उरली आहे की नाही, असा गंभीर प्रश्न आता प्रत्येक पुणेकर विचारत आहे. पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. जर न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणीच नागरिक सुरक्षित नसतील, तर शहरातील इतर भागांत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जीवाची हमी कोण घेणार? असा प्रश्न आहे.

पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? गुन्हेगारांवर जरब बसवण्यात पुणे पोलीस आणि गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे का? केवळ आश्वासने देऊन किंवा कागदोपत्री कारवाया करून शहरातील गुन्हेगारी थांबणार नाही. पुणे पोलीस आयुक्तांनी आणि राज्याच्या गृहखात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून यातील सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
