गुजरातमध्ये जळगावच्या कुटुंबासोबत धक्कादायक घटना! चौघांनी कार अडवून सहा जणांना कालव्यात फेकलं

गुजरात : कामाच्या शोधात निघालेल्या जळगावच्या कुटुंबावर गुजरातमध्ये काळाचा घाला; चौघांनी कार अडवून कुटुंबीयांना कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून दोन मुलांचा शोध सुरू आहे. एका १३ वर्षीय मुलाने पाईपचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला आणि जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन घटनेची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
ही घटना गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ घडली. मूळचे जळगाव परिसरातील असलेले हे कुटुंब एरंडोल येथील एका कारखान्यात मजुरीचे काम करत होते. कामाच्या शोधात कुटुंबातील सदस्य २१ तारखेला कारने सूरतच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांची कार उवा कालव्याजवळ पोहोचली असता दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांचा रस्ता अडवला.

त्यानंतर या चौघांनी कुटुंबातील सदस्यांना कारमधून खाली उतरवून खोल कालव्यात फेकल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी पाण्यात फेकलेल्या १३ वर्षीय मुलाच्या हाताला कालव्यातील पाईप लागला. त्याचा आधार घेत त्याने स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर जवळच्या हॉटेलमध्ये पोहोचून त्याने घडलेला प्रकार सांगितला. हॉटेलमधून पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कालव्यात शोधमोहीम सुरू केली. महुआ तालुक्यातील डुंगरीजवळील काकरापार कालव्यात एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचे मृतदेह आढळले. कुटुंबीयांनी त्यांची ओळख पटवली.

मृतांमध्ये नितीन पाटील आणि कविता पाटील यांचा समावेश आहे. कविता पाटील यांच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर त्या नितीन पाटील यांच्यासोबत राहत होत्या. कुटुंबातील आणखी दोन मुलं अद्याप बेपत्ता असून पोलीस आणि अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, हल्लेखोरांनी कुटुंबाला कालव्यात का फेकले, या घटनेमागे पूर्ववैमनस्य होते का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. खंडिया, आभा, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
