अंधेरी पोलीस ठाण्यात पुन्हा खळबळ! वरिष्ठांच्या बदलीनंतर फटाके फोडणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली; काय आहे प्रकरण?

मुंबई : मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यातील फटाके फोडून केलेल्या सेलिब्रेशनचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून आनंद साजरा करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचीही आता बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, संबंधित महिला कर्मचाऱ्याला तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांची मुंबई पोलीस विशेष शाखा-१ मध्ये बदली करण्यात आली होती. या बदलीचा आदेश आल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता. गेल्या आठवड्यात मंगळवारी घडलेला हा प्रकार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेची पोलीस दलात मोठी चर्चा रंगली होती.

संबंधित महिला कॉन्स्टेबलने यापूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मच्छिंद्र यांची बदली झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता काही दिवसांतच तक्रारदार महिला कॉन्स्टेबलचीही अंधेरी पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके फोडण्याच्या प्रकारावर वकील आशिष राय यांनी आक्षेप घेतला आहे. या सेलिब्रेशनमुळे पोलीस ठाण्यातील आरोपी आणि इतरांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस ठाण्यात फटाके फोडण्याची परवानगी कोणी दिली, याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?
बदली झालेल्या महिला कॉन्स्टेबलचा पती आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. पतीच्या पदाचा धाक दाखवून संबंधित महिला पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांना कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर मच्छिंद्र यांची बदली झाल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. या तक्रारीवर विभागीय चौकशी न करताच बदली करण्यात आल्याचीही चर्चा आहे. संबंधित महिला कर्मचारी कामे टाळत असल्याचा आणि काम सांगितल्यास आत्महत्येची धमकी देत असल्याचा दावा एका पोलीस अधिकाऱ्याने केल्याचे वृत्त आहे.
दुसरीकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांनी या महिला कॉन्स्टेबलविरोधात चार अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले होते, अशीही चर्चा आहे. मात्र, तिच्यावर कारवाई झाली नसल्याचे सांगितले जात आहे. १३ नोव्हेंबर रोजी पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत मच्छिंद्र यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला होता. सार्वजनिक हित, कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय गरज या कारणांचा बदली आदेशात उल्लेख करण्यात आला होता.
यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी बुधवारी अंधेरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. उमेश मच्छिंद्र यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात १८ महिने सेवा बजावली होती. त्यांच्या कार्यकाळातील आणखी सहा महिने बाकी होते. त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात होती.
