कोकण किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची प्रणाली सक्रिय; राज्याच्या हवामानात मोठा बदल, विदर्भात थंडीचा जोर वाढणार

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून जाणवणारी गुलाबी थंडी पुन्हा गायब झाली असून अनेक भागांत दमट वातावरण निर्माण झाले आहे. अचानक तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना थंडीऐवजी चिकचिक आणि उकाड्याचा अनुभव येत आहे. दरम्यान, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा थंडीचा जोर कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आणखी लांबण्याची चिन्हे आहेत.
यंदा एल निनोचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता असून त्याचे परिणाम एप्रिलपर्यंत दिसू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यातच सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्सची सक्रियता कमी असल्याने थंडी वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होत नाही. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी आहे.

स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीचा जोर वाढू शकतो. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील काही भागांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी वाढण्याचे संकेत नाहीत.

महाराष्ट्रात घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. गुलाबी थंडी अचानक गायब झाल्याने अनेक ठिकाणी पुन्हा पंखे सुरू करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, कोकण-गोवा आणि गुजरात सीमेलगत हवेतील चक्राकार वाऱ्यांची प्रणाली सक्रिय झाली आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याऐवजी ढगाळ आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
गेल्या पाच दिवसांत नाशिकच्या किमान तापमानात तब्बल ६.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. परिणामी, थंडीचा जोर कमी होऊन मंगळवारी नाशिकचे किमान तापमान १६.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात थंडीने उसंत घेतली असली तरी विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा विदर्भातील थंडीसाठी अनुकूल ठरू शकतो.
दुसरीकडे, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या घाटमाथ्याच्या भागांत थंडीचा जोर वाढला असून तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे. विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्येही थंडीचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. माफक प्रमाणात पडणारे दव रब्बी पिकांसाठी पोषक ठरू शकते. मात्र, मुंबई, ठाणे आणि कोकणपट्ट्यातील नागरिकांना थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
