बारामतीत खळबळ! शिवन्या लॉजमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बोगस ग्राहक पाठवून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, तिघांवर गुन्हा दाखल

बारामती : बारामती-भिगवण महामार्गावरील सावळ (ता. बारामती) गावच्या हद्दीतील शिवन्या लॉजवर बारामती तालुका पोलिसांनी छापा टाकून अवैध देहव्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला आहे. सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात लॉज मालक, व्यवस्थापक आणि सफाई कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका २६ वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना शिवन्या लॉजमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत बोगस ग्राहक लॉजवर पाठवला. माहितीची खातरजमा झाल्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकला.

या कारवाईत लॉजचा व्यवस्थापक आदित्य पांडुरंग पवार (वय २२, रा. वंजारवाडी, ता. बारामती) आणि सफाई कर्मचारी महंमद नजीर शेख (वय ५४, सध्या रा. शिवन्या लॉज, सावळ; मूळ रा. उस्मानाबाद) हे दोघे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, लॉज मालक निलेश मच्छिंद्र शिंदे (रा. वंजारवाडी, ता. बारामती) याच्या सांगण्यावरून कोलकाता येथील एका २६ वर्षीय महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजीव वसंत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) पहाटे बारामती तालुका पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ मधील कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
