लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजना बंद होणार की सुरूच राहणार? बावनकुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर

मुंबई : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही योजना बंद होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, ती अधिक मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजना अधिक मजबूत करणार!

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यामुळे योजनेच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरजवळील कोराडी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्यावर आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता असली, तरी हा ताण हाताळण्याची सरकारची क्षमता आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असली, तरी पुढील वर्षीही त्यातून मार्ग काढला जाईल. लाडकी बहीण योजना बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून, उलट ती अधिक मजबूत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बोअरवेल आणि टँकरच्या वाढीव दरांवर कारवाईचा इशारा
दुष्काळी परिस्थितीचा फायदा घेऊन काही बोअरवेल व्यावसायिक आणि टँकरचालक नागरिकांकडून जादा पैसे आकारत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यावर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
बोअरवेल खोदण्यावरील बंदी १५ डिसेंबरपर्यंत उठवण्यात आली असताना, ७० हजार रुपयांच्या कामासाठी काही व्यावसायिकांकडून १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. बोअरवेल खोदण्याचे दर ७० हजार रुपयांच्या पुढे जाऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
टँकरचालकांनीही पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांकडून अवाजवी पैसे आकारू नयेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
रोहित पवारांना मोर्चाऐवजी चर्चेचे आवाहन
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रोहित पवार यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याऐवजी सरकारसोबत चर्चा करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. दुष्काळ निवारण समितीचा अध्यक्ष या नात्याने आपले दालन चर्चेसाठी खुले असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या बुधवारी यासंदर्भात बैठक होणार असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याची सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून प्रश्न ऐकून घेतले जात नसतील किंवा मदत मिळत नसेल, तर मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. मात्र, आधी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राहुल नार्वेकरांवरील आरोपांवरही भाष्य
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. आरोपांमध्ये तथ्य असल्यास संबंधितांनी सरकारकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करावी. त्यानंतर सरकार निश्चितपणे चौकशी करेल, असे त्यांनी सांगितले.
ठोस पुराव्यांशिवाय विधिमंडळाच्या अध्यक्षांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीची वारंवार बदनामी करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. आदिवासींच्या जमिनींच्या हस्तांतरणाबाबत कायद्यात काही विशिष्ट परिस्थितींमध्ये तरतुदी असल्याचे सांगत त्यांनी नार्वेकर यांच्यावरील आरोपांशी असहमती दर्शवली.
लाभार्थी महिलांचे योजनेकडे लक्ष
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याच्या बावनकुळे यांच्या स्पष्टीकरणामुळे लाभार्थी महिलांमधील संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. मात्र, राज्यावरील आर्थिक ताण आणि विविध कल्याणकारी योजनांसाठी निधीचे नियोजन ही सरकारसमोरील आव्हाने कायम आहेत. त्यामुळे आगामी काळात सरकार या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करते, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
