एसटी प्रवाशांची मागणी मान्य! NCMC कार्डच्या नियमांत मोठा बदल, आता रिचार्ज करताना पैसे वाचणार; नेमका काय निर्णय?


मुंबई : एसटी महामंडळाने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. कार्ड रिचार्ज करताना आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त कमिशनमुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने कमिशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता कार्डमध्ये केवळ ५ रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सवलतधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रिचार्जवरील ११.८० रुपयांचे कमिशन रद्द

एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड वापरणे आवश्यक आहे. या कार्डमध्ये रिचार्ज करताना प्रत्येक व्यवहारासाठी ११.८० रुपये कमिशन आकारले जात होते. त्यामुळे रिचार्जच्या रकमेतून ही रक्कम वजा होऊन उर्वरित पैसेच कार्डमध्ये जमा होत होते. मात्र, आता प्रवाशांना द्यावे लागणारे हे अतिरिक्त कमिशन रद्द करण्यात येणार आहे.

टॉपअपसाठी शुल्काची एकसमान व्यवस्था

एनसीएमसी कार्ड रिचार्ज करण्यासाठी एसटी महामंडळाने अधिकृत एजंट नियुक्त केले होते. प्रत्येक व्यवहारामागे एजंटना ११.८० रुपये कमिशन दिले जात होते. आता ही कमिशनची तरतूद बंद करण्यात आली असून अधिकृत एजंट आणि एसटी वाहक यांच्याकडून टॉपअपसाठी एकसमान शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, व्यवहारावर लागू असलेला कर भरावा लागणार आहे.

आता ५ रुपयांपासून रिचार्ज करता येणार

यापूर्वी एनसीएमसी कार्डमध्ये ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करावा लागत होता. ग्रामीण भागातील कमी प्रवासभाड्यामुळे कार्डमध्ये अनेकदा अतिरिक्त रक्कम शिल्लक राहत होती. त्यामुळे कमी रकमेच्या रिचार्जची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. ही मागणी मान्य झाली असून आता ५ रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे. म्हणजेच ५, १०, १५, २० रुपयांपासून पुढे आवश्यकतेनुसार टॉपअप करता येईल.

भीम अॅपवरूनही रिचार्जची सुविधा

एनसीएमसी कार्डमध्ये रिचार्ज करण्यासाठी एसटी महामंडळाने भीम अॅपचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय एसटी बसमधील वाहक, बसस्थानकांवरील टॉपअप काउंटर आणि अधिकृत एजंटांकडूनही कार्ड रिचार्ज करता येणार आहे.

एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

दरम्यान, २३ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील १ कोटी ४७ लाख सवलतधारकांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ कोटी २९ लाख कार्ड सक्रिय झाली आहेत. एसटी महामंडळाने कार्ड काढण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली असून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना ३१ डिसेंबरपर्यंत कार्ड काढता येणार आहे. त्यानंतर सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड सोबत असणे अनिवार्य असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!