मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जरांगेंचा मोठा मास्टरप्लॅन! ७ डिसेंबरपासून जिल्ह्याजिल्ह्यांत धडक; कुणबी प्रमाणपत्रांचा हिशेब मागणार, १ डिसेंबरला उलगडणार दौऱ्याचं वेळापत्रक

जालना : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसताना मनोज जरांगे पाटील यांनी आता नव्या मोहिमेची घोषणा केली आहे. ७ डिसेंबरपासून ते थेट महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचणार असून, २१ डिसेंबरपर्यंत हा दौरा चालणार आहे. चार ते पाच टप्प्यांत होणाऱ्या या दौऱ्यातून मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधतेसंदर्भातील अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी कोणत्याही सभा किंवा बैठका होणार नाहीत. मराठा बांधवांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेण्यावर जरांगे यांचा भर असणार आहे.
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषण केल्यानंतर जरांगे यांनी आंदोलन मागे घेत सरकारला मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी काही काळ दिला होता. मात्र, आजही अनेक विद्यार्थी, उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरक्षणाशी संबंधित कागदपत्रे मिळवताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी, जात वैधतेच्या प्रक्रियेतील अडथळे आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा आखला आहे.

प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस; नेमकं काय जाणून घेणार?

या दौऱ्यात प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस दिला जाणार आहे. कुणबी नोंदी उपलब्ध असूनही प्रमाणपत्र न मिळालेल्या व्यक्तींची प्रकरणे, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही, अर्ज प्रक्रियेत कोणत्या अडचणी येत आहेत आणि जात वैधतेसाठी कोणत्या समस्या निर्माण होत आहेत, याची माहिती जरांगे स्थानिक मराठा बांधवांकडून घेणार आहेत. गावागावांतील नागरिकांनी आपापल्या समस्या घेऊन निश्चित ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

१ डिसेंबरला दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर
७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्याचे जिल्हानिहाय वेळापत्रक १ डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहे. चार ते पाच टप्प्यांत सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. स्थानिक पातळीवर कोणत्या ठिकाणी मराठा बांधवांनी एकत्र यायचे, याचे नियोजनही केले जाणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात आंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. मात्र, सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. यापूर्वी त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून विविध ठिकाणी बैठका घेतल्या होत्या आणि आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
आता नव्या दौऱ्यात सभा न घेता थेट नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे जिल्हानिहाय दौऱ्यात कोणत्या तक्रारी समोर येतात आणि त्यानंतर जरांगे कोणती भूमिका घेतात, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
