मराठवाड्यात पाण्यासाठी आतापासूनच कडक निर्बंध! नळातून पाणी वाया गेलं तर खिशाला बसणार २ हजारांचा फटका; मानवत नगर परिषदेचा मोठा निर्णय


परभणी : उन्हाळा सुरू होण्यास अजून काही महिने बाकी असतानाच मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर होऊ लागले आहे. अनेक जलसाठे कोरडे पडत असून विहिरी आणि शेततळ्यांमधील पाण्याची पातळीही खालावत आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना आता दंडाला सामोरे जावे लागणार आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत नगर परिषदेने पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांकडून थेट दोन हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने याबाबत जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे.

मानवत शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती पाहता प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. शहरात जवळपास सहा हजार ५०० नळजोडण्या असून, २८ विभागांच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी दररोज सुमारे २० लाख लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असताना काही नागरिकांकडून पिण्याचे पाणी विनाकारण वाया घालवले जात असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कशामुळे भरावा लागणार दोन हजारांचा दंड?

पिण्याच्या पाण्याचा गरजेपेक्षा अधिक वापर करणे, पाणी विनाकारण वाहू देणे किंवा त्याची नासाडी करणे असे प्रकार आढळल्यास संबंधित नागरिकांवर कारवाई होणार आहे. अशा नागरिकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जाईल, असे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अंतर्गत ही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर आवश्यकतेपुरताच करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

नगर परिषदेच्या निर्णयावर शहरात दोन मतप्रवाह

दुष्काळी परिस्थितीत पाणी वाचवण्यासाठी दंडाची तरतूद योग्य असल्याचे काही नागरिकांचे मत आहे. तर काही नागरिकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या घोषणेनंतर शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

राज्यातील ३१० तालुक्यांत दुष्काळाची घोषणा

दुसरीकडे, राज्यातही दुष्काळाचे परिणाम जाणवू लागले आहेत. शासनाने ३१० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, आवश्यक मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बी पिकांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. पावसाअभावी ज्वारीच्या पेरणीवरही परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांसमोर पिकांना पाणी देण्यासोबतच जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

नोव्हेंबर महिन्यातच पाण्याची चिंता वाढल्याने आगामी उन्हाळ्यात परिस्थिती किती कठीण होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा वेळी मानवत नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयामुळे पाणी बचतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता नियम मोडणाऱ्यांवर प्रत्यक्षात किती कारवाई होते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!