बिस्लेरीच्या पाण्याबाबत धक्कादायक खुलासा! तपासणीत आढळले घातक रासायनिक घटक; FSSAI ची मोठी कारवाई

नवी दिल्ली : पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड बिस्लेरीबाबत अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या परिसरातून गोळा केलेल्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या एका नमुन्याला असुरक्षित घोषित केले आहे. प्रयोगशाळेतील तपासणीत निर्धारित ब्रोमेट मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यानंतर अपील प्रक्रियेत पुन्हा तपासणी केली असता नमुन्यात पॉलीन्यूक्लियर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन (PAHs) हे घटकही आढळले आहेत.
FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित नमुना ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर (मिनरल वॉटर वगळून)’ या श्रेणीतील होता. नियमित तपासणीदरम्यान तो बिस्लेरी इंटरनॅशनलच्या परिसरातून गोळा करण्यात आला होता. प्राथमिक प्रयोगशाळेतील अहवालात पाण्यातील ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेनुसार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत हा नमुना असुरक्षित ठरवण्यात आला.

पुन्हा तपासणी केली, तरीही नमुना असुरक्षित

प्राथमिक अहवालानंतर संबंधित फूड बिझनेस ऑपरेटरने (FBO) अपील केले. त्यानुसार नमुना रेफरल फूड लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला. मात्र, या दुसऱ्या तपासणीतही नमुना असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पाण्याच्या नमुन्यात पॉलीन्यूक्लियर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन (PAHs) या रासायनिक घटकांची उपस्थिती आढळून आली.

PAHs हा रासायनिक संयुगांचा समूह असून त्यातील काही संयुगे कर्करोगाशी संबंधित असल्याचे मानले जाते. तसेच ब्रोमेटचे वर्गीकरण संभाव्य कर्करोगकारक घटक म्हणून करण्यात आले आहे. त्यामुळे या तपासणी अहवालामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बिस्लेरी कंपनीविरोधात चौकशीला मंजुरी
दोन्ही प्रयोगशाळांच्या तपासणी अहवालांमध्ये नमुना असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर FSSAI ने बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत चौकशी करण्यास मंजुरी दिली आहे. संबंधित नमुन्याच्या तपासणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.
दरम्यान, FSSAI ने उपलब्ध करून दिलेल्या माहितीत संबंधित नमुन्याचा बॅच नंबर, तपासणीची तारीख किंवा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या बिस्लेरीच्या अन्य उत्पादनांबाबत स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे ही बाब तपासणी करण्यात आलेल्या विशिष्ट नमुन्यापुरती मर्यादित आहे. सर्व बिस्लेरी उत्पादनांबाबत निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
