एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! शिवसेना नगराध्यक्षांची बैठक बोलावली; कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नगराध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दुपारी दोन वाजता ही बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पाणीटंचाईचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत नगराध्यक्षांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत, शेतकऱ्यांच्या समस्या आणि पाणीटंचाईवर उपाययोजना याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

याशिवाय आगामी निवडणुकांची तयारी, महायुतीतील समन्वय आणि मित्रपक्षांमधील वाद यावरही चर्चा होऊ शकते. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे आणि विकासकामांना गती देण्याबाबतही बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सोलापूर दौऱ्यावर होते. कार्तिकी एकादशीनिमित्त त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बळीराजावरील संकट आणि दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी विठुरायाकडे साकडे घातले. ‘मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर वारकरी म्हणून आलो आहे. बळीराजाला ताकद दे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपरिषदेत शिंदे गटातील अंतर्गत वादही चर्चेत आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील दोन नगरसेवकांनी नगराध्यक्ष आसेफ खान शेरगुल खान यांच्यावर भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराचे आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामे सादर केले होते. न
गरसेविका आलम तरन्नुम बेगम मुजीब आणि नगरसेवक पठाण हसीब खान तहजीब खान यांनी स्वतंत्र पत्रांद्वारे बिनशर्त राजीनामे दिले होते. त्यामुळे मुंबईतील बैठकीत पाथरीतील या वादावरही चर्चा होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
