नाशिकमध्ये मोठी खळबळ! डोक्यात गोळी झाडून निवृत्त RTO अधिकाऱ्याने संपवलं जीवन, घटनेने प्रशासकीय वर्तुळ हादरले

नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) हेमंत गोविंद हेमाडे यांचा राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नाशिकच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राहत्या घरात गोळी झाडून संपवलं जीवन


मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त सहाय्यक परिवहन अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे हे नाशिकमधील सिटी सेंटर मॉल परिसरात वास्तव्यास होते. त्यांनी राहत्या घरातच स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. गोळीबाराचा आवाज येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली.

हेमंत हेमाडे यांनी हा टोकाचा निर्णय नेमक्या कोणत्या कारणामुळे घेतला, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबीक कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट किंवा इतर काही ऐवज मिळाला का? याची अधिकृत माहिती समोर आली नाही. सध्या पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. एवढ्या मोठ्या पदावरील निवृत्त अधिकाऱ्याने अशाप्रकारे जीवन संपवल्याने विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.
