सुनेत्रा पवारांचा नांदेड दौरा चर्चेत! बोअरवेल खोदण्यावर कडक निर्बंध, दुष्काळ निवारणासाठी घेतले महत्त्वाचे निर्णय


नांदेड : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या सुरुवातीलाच सकाळी ९ वाजता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई, चाऱ्याची उपलब्धता, रब्बी हंगामातील पेरणी, तसेच आगामी काळातील उपाययोजना आणि नियोजनाबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी आणि बोअरवेलच्या खोदकामाबाबत कडक निर्देश दिले. विशेषतः २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदण्यास बंदी घालण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या नियमांनुसार पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखीव ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. चारा व्यवस्थापनासाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, आतापर्यंत १४ हजार शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. टंचाई निवारणाच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कृषिमंत्र्यांच्या बैठकीतील काजू-बदाम चर्चेनंतर पत्रकारांना प्रवेश नाकारला

काही दिवसांपूर्वी कृषिमंत्र्यांच्या बैठकीत आमदार आणि खासदारांनी काजू-बदाम खाल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या दुष्काळी आढावा बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे दिसून आले.

धर्माबादमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरातही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बाभळी बंधारा आणि इळेगाव नदीपात्रातील उपलब्ध जलसाठा केवळ जानेवारीपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. त्यामुळे दररोजचा पाणीपुरवठा ३ दशलक्ष लिटरवरून कमी करून दीड दशलक्ष लिटर करण्यात आला आहे.

धर्माबाद शहराची लोकसंख्या ४२ हजार ५०० असून, नागरिकांसाठी ३ हजार नळजोडण्या, ९५ बोअरवेल आणि ३३ हातपंपांचे पर्याय उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन नगरपालिका मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!