पुरंदर हादरले! पांगारे येथे दिराकडून शिक्षिका भावजयीची हत्या; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

सासवड : पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे कौटुंबिक वादातून एका शिक्षिकेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) उघडकीस आली. उज्वला रामदास काकडे (रा. पांगारे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या दिराविरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उज्वला काकडे या हडपसर येथील साधना विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या नेहमीप्रमाणे पांगारे येथून हडपसरकडे जात असताना पांगारे येथील न्यू इंग्लिश स्कूलपासून सुमारे दीडशे फूट अंतरावर ही घटना घडली. त्यांच्या दिराने मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅरी मॉडेलच्या टेम्पोने त्यांना मागून धडक दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उज्वला यांच्या पती रामदास यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यांचे माहेर बारामती तालुक्यातील वढाणे हे गाव आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या आदल्या दिवशीच त्यांच्या सातवीत शिकणाऱ्या मुलीचा वाढदिवस होता.

संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घरातीलच नातेवाईकाकडून महिलेची हत्या झाल्याने पांगारेसह संपूर्ण पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत.

