पतीला सोडायला लावलं, ८ महिने शरीरसंबंध ठेवले; लग्नाची वेळ येताच गांबियाच्या विद्यार्थ्याने असा रंग दाखवला की…!

भोपाळ : नव्या आयुष्याची स्वप्नं दाखवून एका महिलेला वैवाहिक आयुष्यापासून दूर केलं आणि त्यानंतर तब्बल आठ महिने लग्नाचं आश्वासन देत तिचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, महिलेने विवाहासाठी आग्रह धरताच आरोपीने लग्नास नकार दिला. एवढंच नाही, तर जाब विचारल्यावर मारहाण केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी भोपाळ पोलिसांनी गांबिया देशातील एका विद्यार्थ्याला अटक केली आहे.
या घटनेतील आरोपीचे नाव बोबाकर जालो असून, तो विद्यार्थी व्हिसावर भारतात आला होता. भोपाळमध्ये राहून तो बी.कॉम.चे शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ३४ वर्षीय पीडित महिलेने कोलार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.


वैवाहिक वादातून ओळख, त्यानंतर लग्नाचं आमिष!

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला पतीसोबतच्या वैवाहिक वादामुळे त्रस्त होती. याच काळात तिची बोबाकर जालो याच्याशी ओळख झाली. सुरुवातीला मैत्री आणि नियमित संवाद असलेल्या या संबंधांना पुढे वेगळं वळण मिळालं. आरोपीने महिलेसोबत विवाह करण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यासाठी आधी पतीपासून वेगळं होण्याची अट घातल्याचा आरोप आहे.

आरोपीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून महिलेने पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. लग्न करणार असल्याचे सांगून आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. जवळपास आठ महिने तो विवाहाचे आश्वासन देत राहिला आणि या काळात तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
महिलेने लग्नाचा आग्रह धरला अन् आरोपीचा नकार!
आठ महिने उलटल्यानंतर महिलेने प्रत्यक्ष लग्न करण्यासाठी आरोपीकडे तगादा लावला. मात्र, यावेळी त्याने विवाह करण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. महिलेने या नकाराबाबत जाब विचारला असता आरोपीने तिच्याशी मारहाण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
गांबियाच्या दूतावासालाही पोलिसांची माहिती
या प्रकारानंतर महिलेने कोलार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे बलात्कारासह संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा नोंदवून बोबाकर जालो याला अटक केली. आरोपी परदेशी नागरिक असल्याने गांबियाच्या संबंधित दूतावासालाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.
भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार सिंह यांनी आरोपीच्या अटकेला दुजोरा दिला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. लग्नाचे आश्वासन देऊन महिलेला पतीपासून वेगळे होण्यास सांगितल्यापासून ते आठ महिन्यांनंतर लग्नास नकार देण्यापर्यंतच्या घटनांची आता पोलीस चौकशी करत आहेत.
