मोठी बातमी! गोकुळच्या दूध दरात मोठी वाढ; इतिहासातील सर्वाधिक दरवाढीचा निर्णय, ग्राहकांना फटका

कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गोकुळ दूध संघाच्या नव्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध दरवाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. गोकुळच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ असल्याचे सांगितले जात आहे.
दरवाढीमागे ७० कोटींच्या तुटीचे कारण


प्रशासकांच्या कार्यकाळात दूध संघाला सुमारे ७० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि संस्थेचा आर्थिक समतोल साधण्यासाठी दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याचे संचालक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जानेवारीत पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता

सध्याच्या दरवाढीनंतरही आगामी काळात दूध दराचा आढावा घेतला जाणार आहे. जानेवारी महिन्यात दुधाची उपलब्धता आणि बाजारातील परिस्थिती पाहून पुन्हा दरवाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शनिवारपासून नवे दर लागू होणार
गोकुळच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, दूध खरेदी आणि विक्रीचे नवे दर शनिवारपासून लागू होणार आहेत. या दरवाढीचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार असला, तरी दूध खरेदी दर वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
गोकुळच्या नव्या दरवाढीनुसार खरेदी-विक्री दरातील बदल
* म्हशीचे दूध विक्री दर: प्रतिलिटर ६ रुपयांची वाढ.
* म्हशीचे दूध खरेदी दर: प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ.
* गायीचे दूध खरेदी दर: प्रतिलिटर २ रुपयांची वाढ.
* गायीचे दूध विक्री दर: प्रतिलिटर २ रुपयांची वाढ.
