थेऊरमधील तृतीयपंथीयांच्या राष्ट्रीय संमेलनात दागिने गायब; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोणी काळभोर : थेऊर फाटा (ता. हवेली) येथील वृंदावन पॅलेस येथे आयोजित तृतीयपंथीय समाजाच्या राष्ट्रीय संमेलनात विक्रीसाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिने लक्झरी बसमधून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
या चोरीत हैदराबाद येथील एका सुवर्णकाराचे तब्बल २ लाख ३८ हजार रुपयांचे दागिने गायब झाले आहेत. प्रवासादरम्यान बसमध्ये ठेवलेल्या बॅगेतील दागिन्यांचे दोन प्लास्टिकचे डबे अज्ञात चोरट्याने लंपास केले.


मनोज हरीनारायण सोनी (वय ५०, रा. हैदराबाद) असे फिर्यादी सुवर्णकाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील एका परिचित व्यक्तीने सोनी यांना थेऊर फाटा येथील तृतीयपंथीयांच्या राष्ट्रीय संमेलनात दागिन्यांच्या विक्रीची संधी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी नाकातील नोज पिन, कानातील दागिने तसेच विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने तयार करून सोबत घेतले होते.

सोनी हे १५ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास लक्झरी बसने हैदराबादहून लोणी काळभोरकडे निघाले. प्रवासादरम्यान बस दोन ठिकाणी चहा-नाश्त्यासाठी थांबली. यावेळी सोनी बसमधून खाली उतरले; मात्र दागिने असलेली बॅग बसमधील सीटवरच ठेवली होती. दुसऱ्या दिवशी, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास ते थेऊर फाटा येथे उतरले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये खोली घेऊन फ्रेश होत असताना बॅगेतील दागिन्यांचे दोन प्लास्टिकचे डबे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १ लाख ९८ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम सोन्याचे, तर ४० हजार रुपये किमतीचे सुमारे १५० ते २०० ग्रॅम चांदीचे दागिने होते. यामध्ये नोज पिन, कानातील वेल, लटकन, नेकलेस, ब्रेसलेट, चेन, बाजूबंद आणि टॉप्स अशा दागिन्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी मनोज सोनी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस प्रवासादरम्यान नेमक्या कोणत्या ठिकाणी दागिने चोरीला गेले, याचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
