अजितदादांच्या शेवटच्या प्रवासाचं रहस्य उलगडणार? ६ ते ९ वाजेपर्यंतचं फुटेज मागितलं, पण पोलिसांनी माहिती रोखली; RTI मधून काय उघड झालं?


मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांच्या शेवटच्या प्रवासाबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित होत आहेत. बारामतीला जाण्यापूर्वी नियोजनात अचानक बदल का झाला? देवगिरी बंगल्यातून निघाल्यानंतर अजितदादांसोबत नेमकं कोण होतं? विमानतळावर त्यांना निरोप देण्यासाठी कोण उपस्थित होतं? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी माहिती अधिकारातून तब्बल तीन तासांचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले. मात्र, मुंबई पोलिसांनी ही माहिती देण्यास नकार दिल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणातील काही महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या. त्यांच्या दाव्यानुसार, अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवार यांना काही फोन आले होते. त्यानंतर संध्याकाळी प्रवास करण्याचे नियोजन बदलून दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने बारामतीला जाण्याचे ठरले. शेवटच्या ४५ मिनिटांत मंत्रालयातील दोन सचिव महत्त्वाची फाईल घेऊन देवगिरी निवासस्थानी आले होते. फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी लागलेल्या वेळेमुळे प्रवास बदलल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, अजित पवार यांच्या चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री पुण्याला मुक्काम करून सकाळी रस्त्याने बारामतीला जाण्याचा विचार होता. मात्र, ऐनवेळी विमानप्रवासाचा निर्णय घेण्यात आला. हा बदल नेमका कशामुळे झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माहिती अधिकारातील अर्जाने वाढवले प्रश्न!

नितीन संजय यादव यांनी २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ६ ते सकाळी ९ या वेळेतील देवगिरी बंगला ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. अजित पवार यांच्यासोबत कोण होते, त्यांना निरोप देण्यासाठी कोण आले होते आणि संशयास्पद व्यक्तींची हालचाल झाली होती का, याचीही माहिती मागण्यात आली. मात्र, वैयक्तिक गोपनीयतेचे कारण देत मुंबई पोलिसांनी माहिती नाकारली. त्यानंतर दाखल केलेल्या प्रथम अपिलातूनही संपूर्ण फुटेज मिळाले नाही.

विमानतळाचे फुटेज आधीच तपास यंत्रणेकडे!

दुसऱ्या अर्जाला उत्तर देताना ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या मुंबई कार्यालयाने विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणेकडे सुपूर्द केल्याचे सांगितले. माहिती अधिकार कायद्यातील कलम ८(१)(ह) नुसार तपासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्यास माहिती देता येत नसल्याचेही स्पष्ट केले.

या प्रकरणात सुरुवातीला कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल झाली होती. त्यानंतर तपास बारामती पोलिसांकडे वर्ग करून सीआयडीकडे सोपवण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीची भूमिका मांडली आहे. तर रोहित पवार यांनी काही व्यक्तींना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

आता तीन तासांच्या फुटेजमध्ये काय नोंदले गेले आहे, प्रवासाचा निर्णय का बदलला आणि अजितदादांच्या शेवटच्या प्रवासातील महत्त्वाच्या घडामोडी कधी समोर येणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!