झुणका-भाकरी, पुरणपोळी अन् वांग्याचे भरीत! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मिळणार मराठमोळ्या जेवणाची मेजवानी, मुंबईहून…

मुंबई : रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-बंगळुरू वंदे भारत शयनयान एक्सप्रेसमध्ये आता प्रवाशांना अस्सल महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. नेहमीच्या वरण-भात, पनीरची भाजी आणि फुलक्यांऐवजी प्रवाशांच्या ताटात आता पुरणपोळी, झुणका-भाकरी आणि वांग्याचे झणझणीत भरीत पाहायला मिळू शकते.
भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) यासाठी नियोजन करत आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख प्रवाशांना करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले जात आहे.


पुरणपोळीला प्रवाशांची सर्वाधिक पसंती

रेल्वे प्रवासात जेवणाची सुविधा महत्त्वाची असते. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना ताजे आणि गरम जेवण उपलब्ध करून दिले जाते. मात्र, आता या मेन्यूमध्ये महाराष्ट्रीय पदार्थांचा समावेश करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी IRCTC ने प्रवाशांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी चाचण्या घेतल्या. त्यामध्ये पुरणपोळीला सर्वाधिक पसंती मिळाल्याची माहिती आहे.

झुणका-भाकरी आणि वांग्याच्या भरीताचीही मेजवानी
पुरणपोळीसोबतच झुणका-भाकरी, वांग्याचे झणझणीत भरीत आणि पिठलं अशा पारंपरिक पदार्थांचाही मेन्यूमध्ये समावेश करण्याचा विचार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान महाराष्ट्राच्या खास खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे.
रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर मिळणार सुविधा
या पदार्थांची निवड रेल्वे मंडळाच्या खानपानविषयक नियमांनुसार केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात येईल. मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच हे पदार्थ प्रत्यक्षात प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
त्यामुळे मुंबई-बंगळुरू वंदे भारत शयनयान एक्सप्रेसमधील जेवणाच्या मेन्यूमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना आता रेल्वेच्या प्रवासात मराठमोळ्या जेवणाची चव चाखता येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
