नागपूरच्या आखाड्यात १३ वर्षांनंतर पुन्हा कुस्तीचा महासंग्राम! १३०० मल्ल भिडणार, चार दिवस ठरणार महाराष्ट्राचा नवा ‘केसरी’; तारखाही जाहीर


नागपूर : महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा तब्बल १३ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा नागपूरमध्ये रंगणार आहे. जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्यभरातील कुस्तीपटू सज्ज होणार असून, तब्बल १३०० मल्ल आपले कौशल्य आणि ताकद पणाला लावणार आहेत. २० ते २४ जानेवारीदरम्यान नागपूरमध्ये कुस्तीचा हा महासंग्राम रंगणार असल्याने विदर्भातील कुस्तीप्रेमींमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. लकडगंज परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर कुस्तीचा आखाडा सजवला जाणार आहे. २०१४ नंतर प्रथमच नागपूरला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद मिळत असल्याने स्थानिक कुस्ती क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.

४२ शहरांतील मल्लांची ताकद पणाला लागणार

या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ४२ शहरे आणि विविध संघ सहभागी होणार आहेत. जवळपास १३०० मल्ल वेगवेगळ्या वजनगटांत प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देतील. राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या पैलवानांना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे. महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणे हे प्रत्येक कुस्तीपटूचे स्वप्न असते. त्यामुळे यंदा कोणता मल्ल अंतिम विजेतेपदावर नाव कोरणार, याकडे कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

मातीचा आखाडा आणि मॅटवरही रंगणार लढती

स्पर्धेसाठी मैदानात दोन मॅटचे आखाडे आणि दोन मातीचे आखाडे उभारण्याचे नियोजन आहे. आधुनिक कुस्तीतील डावपेचांसोबत पारंपरिक मातीतील कुस्तीचाही अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. खेळाडूंना आवश्यक सुविधा आणि स्पर्धेच्या नियोजनासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी नागपूरला १३ वर्षांनंतर यजमानपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या स्पर्धेमुळे विदर्भातील कुस्तीपटूंना मोठे व्यासपीठ मिळणार असून नागपूरमध्ये कुस्तीचा उत्सव अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आता जानेवारीतील या महासंग्रामात कोण कोणत्या मल्लाला चितपट करणार आणि महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब कोण पटकावणार, याची उत्सुकता राज्यभरातील कुस्तीप्रेमींना लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!