नक्षली शस्त्रांची माहिती देणाऱ्यांना मिळणार बक्षीस! पालघरला दोन मोठ्या भेटी; फडणवीस सरकारचे कॅबिनेट बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय..


मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गृह, उच्च व तंत्र शिक्षण, विधि व न्याय आणि वस्त्रोद्योग विभागाशी संबंधित चार महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयांमुळे नक्षलविरोधी मोहिमेला बळ मिळण्यासोबतच पालघर जिल्ह्यातील न्यायव्यवस्था आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.

नक्षलवाद्यांकडील शस्त्रांची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस

गृह विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत अचूक माहिती देणाऱ्या नागरिकांसाठी रोख बक्षीस योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा शोधून जप्त करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना मदत होणार आहे. त्यामुळे राज्याच्या नक्षलविरोधी मोहिमेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात सुधारणा

राज्यातील उच्च आणि तंत्र शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६’ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षण क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन या कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.

पालघरमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

विधि व न्याय विभागाच्या निर्णयानुसार पालघर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुख्य दंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी वकील कार्यालयांसह आवश्यक पदांच्या निर्मितीलाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील न्यायालयीन सुविधांना बळ मिळणार आहे.

वस्त्रोद्योग धोरणात बदल; पालघरचा झोन-१ मध्ये समावेश

राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणातही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयानुसार पालघर जिल्ह्याचा ‘झोन-१’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच धोरणातील ‘झोन-४’ ही वर्गवारी रद्द करण्यात आली असून, उद्योगांच्या विस्तारीकरणासंदर्भातील नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

या चार निर्णयांमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्था, उच्च शिक्षण, न्यायालयीन सुविधा आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात महत्त्वाचे बदल होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!