रक्षा खडसेंची खेळी न्यायालयात फसली? मुक्ताईनगरच्या दोन उमेदवारांवरून मोठा पेच; हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता २९ नोव्हेंबरला काय घडणार?

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगरमधील उमेदवारीचा वाद चांगलाच चर्चेत आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शिवसेनेच्या दोन उमेदवारांच्या अर्जांविरोधात घेतलेली भूमिका न्यायालयात टिकू शकली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने त्यांच्या दोन्ही याचिका फेटाळल्याने २९ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. मात्र, निकालानंतरही हा कायदेशीर लढा सुरू राहू शकतो.
मुक्ताईनगरमधील विनोद तराळ आणि दिवानी देशमुख यांच्या उमेदवारी अर्जांवर रक्षा खडसे यांनी आक्षेप नोंदवला होता. हे अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ‘रक्षा खडसे विरुद्ध जिल्हा सहकारी संस्था’ या प्रकरणाची सुनावणी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांच्या खंडपीठासमोर पार पडली.


या सुनावणीत प्रतिवादींच्या वकिलांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये, असा युक्तिवाद केला. मतदान २९ नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगतानाच, उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने स्वीकारला गेला असल्यास निवडणुकीनंतर त्याला कायदेशीर आव्हान देता येते, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे सध्या दाखल केलेल्या दोन्ही रिट याचिका ग्राह्य धरता येणार नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

अखेर न्यायालयाने रक्षा खडसे यांच्या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. परिणामी, मुक्ताईनगरमधील उमेदवारीचा वाद असला तरी जिल्हा बँकेची निवडणूक थांबणार नाही. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित वेळापत्रकानुसार मतदान होणार आहे.

मात्र, या प्रकरणातील कायदेशीर दार पूर्णपणे बंद झालेले नाही. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर योग्य त्या निवडणूक याचिकेद्वारे निर्णयाला आव्हान देण्याची मुभा रक्षा खडसे यांना न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे आता मतदानानंतर या उमेदवारीविषयीचा वाद पुन्हा न्यायालयात पोहोचतो का, याकडे लक्ष लागले आहे.
