अजितदादांच्या अपघातामागचं ‘ते’ गूढ उकलणार? अखेर मफलर मॅनचा चेहरा आला समोर; तटकरे-पटेलांच्या फोनपासून १५० कोटींच्या विमानापर्यंत अनेक प्रश्न!


मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत त्यांना ‘मफलरमॅन’ संबोधले. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मात्र, फडणवीस यांनी अजितदादांचा घातपात केला, असे आपण म्हणत नसून कंपनीच्या मालकाला संरक्षण दिले जात असल्याचा संशय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, व्ही. के. सिंह आणि त्यांच्या कंपनीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सिंह यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा आपला दावा आहे. सरकारकडे सीआयडी आणि इतर तपास यंत्रणा असतानाही कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून आरोपांमधील सत्य समोर आणावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

तटकरे-पटेलांच्या फोनमुळे प्रवास बदलला?

अजित पवार सुरुवातीला रस्त्याने बारामतीला जाणार होते. मात्र, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोन आले. भेटायला येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी अन्य एका व्यक्तीने फाईलवर सही आवश्यक असल्याचे सांगून दादांना थांबवले. त्यामुळे त्यांचा दौरा पुढे गेला आणि रस्त्याऐवजी विमानाने प्रवास करण्याची वेळ आली, असा दावा रोहित पवारांनी केला. पक्षातील दोन नेत्यांमुळे दादांचा प्रवास बदलल्याचा आरोपही त्यांनी केला.

बारामती पोलिसांपासून कर्नाटकातील शून्य एफआयआरपर्यंत

या प्रकरणात बारामती पोलिसांकडे गेल्यानंतर सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याची तयारी होती. मात्र, कोणाचा तरी फोन आल्यानंतर पोलिसांनी नकार दिला, असा आरोप रोहित पवारांनी केला. त्यानंतर कर्नाटकात शून्य एफआयआर दाखल करण्यात आला. हा गुन्हा महाराष्ट्रात वर्ग झाल्यावर सीआयडीने स्वतंत्र गुन्हा म्हणून नोंद न करता जोडपत्र म्हणून स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. डीजीसीएकडे पुरावे दिल्यानंतरही कारवाई झाली नसल्याची टीकाही त्यांनी केली.

२७ कंपन्या, ८६८ कोटींचे व्यवहार अन् १८ कोटींचे घर

व्हीएसआर कंपनीच्या व्यवहारांबाबत रोहित पवारांनी अनेक दावे केले. व्ही. के. सिंह यांच्या २७ कंपन्या असून, कोलकात्यातील कंपनीच्या माध्यमातून ८६८ कोटी रुपयांचा पैसा पांढरा केल्याचा आरोप त्यांनी केला. कंपनीच्या मालकाच्या मुलाने अजितदादांच्या निधनानंतर दोन दिवसांत अमेरिकेत १८ कोटी रुपयांचे घर खरेदी केल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचे व्यावसायिक संबंध अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित व्यक्तींशी असल्याचा आरोपही केला. या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

१५० कोटींच्या विमानाचा मालक कोण?

पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी व्हीएसआरशी संबंधित विमानांची यादी सादर केली. त्यात लेगसी ६००, लिअरजेट आणि फाल्कन यांसारख्या विमानांचा उल्लेख होता. विशेष लक्ष वेधले ते व्हीटी-व्हीएसव्ही क्रमांकाच्या लेगसी ६५० विमानाने. या विमानाची किंमत १५० कोटी रुपये असल्याचा दावा करत त्याचा मालक कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अपघाताच्या आदल्या दिवशी आणि त्यानंतर समता पतसंस्थेत कोट्यवधींचे व्यवहार झाल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. अजितदादांच्या बारामतीतील घराबाहेर काळी जादू केल्याच्या कथित प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

सरकारकडून १६८ कोटी रुपये दिल्याचा दावा

अजितदादांच्या निधनानंतर व्हीएसआर कंपनीला राज्य सरकारने १६८ कोटी रुपये दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. शेतकऱ्यांसाठी निधी नसल्याचे सांगितले जाते, मात्र कंपनीला पैसे देणे सुरूच असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत, “काकांना न्याय देऊ शकलो नाही तर सामान्य माणसाला काय न्याय देणार?” अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

रोहित पवारांनी केलेले आरोप अद्याप तपासातून सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व्हीएसआर कंपनी आणि संबंधित नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, तसेच अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!