इंदापूरनंतर आता पंढरपुरात विहीर दुर्घटना! ढिगाऱ्याखाली गाडलेल्या ४ मजुरांचा मृत्यू; सरकारकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात विहीर खोदकाम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. आंबे गावात विहिरीचा कठडा आणि माती-दगडांचा मोठा ढिगारा अचानक कोसळल्याने चार मजूर त्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत चारही मजुरांचा मृत्यू झाला आहे. तब्बल २४ तासांच्या बचावकार्यानंतर चारही मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
विहीर खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतात नवीन विहिरीचे खोदकाम सुरू होते. यावेळी अचानक दगड-माती आणि विहिरीच्या कठड्याचा मोठा ढिगारा मजुरांवर कोसळला. या दुर्घटनेत रांजणी येथील मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे, तसेच अनवली येथील तानाजी घोडके आणि आबा घोडके हे चार मजूर ढिगाऱ्याखाली अडकले.

२४ तासांच्या बचावकार्यानंतर चारही मृतदेह बाहेर

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, विहिरीची खोली आणि मोठ्या प्रमाणातील माती-दगडांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले.
रविवारी रात्री १०.३० वाजता पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सोमवारी पहाटे ४ वाजता दुसरा, सकाळी ८.३० वाजता तिसरा आणि अखेर सकाळी ११ वाजता चौथा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सलग २४ तासांच्या प्रयत्नांनंतर बचावकार्य पूर्ण झाले.
मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
या दुर्घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी मध्यरात्री घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि पोलीस प्रशासनाकडून बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच मृत मजुरांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत मजुरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन होणार
या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार, ब्लास्टिंगमुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासात नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, विहीर खोदकाम करताना आवश्यक शासकीय परवानग्या आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
