अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीचा हात का धरला? अमित शाहांनी सांगितला पडद्यामागचं सिक्रेट; ‘त्या’ एका उत्तराने उलगडलं राजकीय गणित!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या निर्णयामागे नेमकं कारण काय, याबाबत अनेक चर्चा झाल्या. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजितदादांसोबत झालेल्या एका संवादाचा उल्लेख करत त्यांच्या महायुती प्रवेशामागची भूमिका सांगितली आहे. पुण्यात अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी शाह यांनी हा किस्सा सांगितला.
अजितदादांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतल्याचं समजल्यानंतर आपल्यालाही आश्चर्य वाटलं होतं, असं शाह यांनी सांगितलं. अजितदादांची राजकीय पार्श्वभूमी वेगळी असल्याने त्यांच्या या निर्णयाचा जनतेला धक्का बसेल, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी थेट अजितदादांनाच विचारलं की, सत्ता तर येते आणि जाते, मग एवढा मोठा राजकीय निर्णय घेण्याची गरज का पडली?


त्यावर अजितदादांनी दिलेलं उत्तर शाह यांनी उपस्थितांसमोर उघड केलं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या विकासाची दिशा आणि महायुतीची भूमिका यांचा संबंध अधिक दृढ झाला आहे. महाराष्ट्राचा विकास आणि देशाची प्रगती या दोन्ही गोष्टी वेगळ्या करता येणार नाहीत. मला महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे, त्यामुळे महायुतीचा सदस्य होण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका अजितदादांनी मांडल्याचं शाह यांनी सांगितलं.

महायुतीत येण्यासाठी आधीही केले होते प्रयत्न

अजित पवार यांना महायुतीत सहभागी होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागली होती. यापूर्वी दोन ते तीन वेळा महायुतीत येण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. मात्र, अखेर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाली. त्यानंतर अजितदादा आणि आपल्यातील मैत्री अधिक घट्ट झाल्याचं शाह यांनी सांगितलं.
कार्यकर्त्यांसाठी शाह-फडणवीसांशीही घेतला होता पंगा
अजितदादांच्या स्वभावातील आणखी एका महत्त्वाच्या गुणाचाही शाह यांनी उल्लेख केला. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नांवर अजितदादांनी आपल्याशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संयमाने चर्चा केली होती. मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर अनेकजण वैयक्तिक हितसंबंधांचा विचार करतात; मात्र अजितदादा आपल्या कार्यकर्त्यांशी असलेलं नातं जपण्यासाठी नेहमी आग्रही असायचे. कार्यकर्त्यांसाठी ठामपणे उभा राहणारा नेता वेगळाच असतो, अशा शब्दांत शाह यांनी त्यांचं कौतुक केलं.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय प्रवासातील अनेक आठवणी पुन्हा चर्चेत येत आहेत. महायुतीत जाण्याचा निर्णय घेताना अजितदादांनी विकासाचा मुद्दा पुढे केला होता, असा दावा अमित शाह यांनी त्यांच्या संवादाचा दाखला देत केला. त्यामुळे अजितदादांच्या महायुती प्रवेशामागील कारणांवर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
