तुकाराम मुंढेंच्या FDAचा हॉटेल व्यावसायिकांना दणका! महाबळेश्वरमधील ३ प्रसिद्ध हॉटेलचे परवाने निलंबित, ५ हॉटेल्सना नोटीस; नेमकं कारण काय?


सातारा : महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांमधील त्रुटी आढळल्याने तीन नामांकित हॉटेलचे अन्न विक्री परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. तसेच अन्य पाच हॉटेल्सना नोटीस बजावून त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ऐन सुट्टीच्या काळात झालेल्या या कारवाईमुळे संबंधित हॉटेल्समध्ये बुकिंग केलेल्या पर्यटकांची गैरसोय झाली आहे. पर्यटकांना आता राहण्यासाठी पर्यायी हॉटेल्स शोधावी लागत आहेत.

महाबळेश्वरमधील तीन प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमधील हॉटेल रामसुख, हॉटेल ब्राईटलँड आणि हॉटेल एव्हरशाईन या तीन हॉटेलमध्ये तपासणीदरम्यान त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या हॉटेलचे अन्न विक्री परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय अन्य पाच हॉटेल्सनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तुकाराम मुंढे पदभार स्वीकारताच कारवाईचा धडाका

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यभरात तपासणी आणि कारवाईची मोहीम वेगाने सुरू झाली आहे. गेल्या महिनाभरात विविध ठिकाणी छापे टाकून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महाबळेश्वरमधील हॉटेल्सवरील कारवाईही याच मोहिमेचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

गुटखा विक्रेत्यांवर मकोकाची कारवाई होणार?

दरम्यान, गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाला आणि प्रतिबंधित तंबाखूमिश्रित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्कविरोधात मकोका लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या प्रकरणात विक्री करणाऱ्यांसोबतच खरेदी करणाऱ्यांची जबाबदारीही निश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या गैरप्रकारांमध्ये विभागातील काही अधिकारी सहभागी असल्याच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे. अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा मुंढे यांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!