अजित पवार यांचा जीवनपट पुणे जिल्हा परिषदेने जपला! मुख्यालयात पुतळा, छायाचित्र दालन, लघुपट आणि कॉफी टेबल बुकचे अमित शहांच्या हस्ते आज लोकार्पण

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणी जपण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून, सोमवारी (दि. १६) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यासोबतच अजित पवार यांच्या जीवनप्रवासावर आधारित छायाचित्र दालन, कॉफी टेबल बुक आणि लघुपटाचेही प्रकाशन केले जाणार आहे.
अजित पवार यांचे पुणे जिल्हा परिषदेशी गेल्या अडीच ते तीन दशकांपासून जवळचे संबंध होते. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी ग्रामीण विकासाच्या कामांना विशेष प्राधान्य दिले. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, प्रशासकीय इमारतींची उभारणी, विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणे आणि पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.


जिल्हा परिषद मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या इमारतींच्या उभारणीतही त्यांचा मोठा वाटा होता. पदाधिकारी निवडीपासून विकासकामांच्या नियोजनापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाला विशेष महत्त्व दिले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली.

अजित पवार यांच्या निधनानंतर १२ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आजी-माजी पदाधिकारी आणि सदस्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत जिल्ह्याच्या विकासातील योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या स्मरणार्थ विशेष पुस्तक प्रकाशित करण्यासह विविध योजनांना त्यांचे नाव देण्याबाबतही चर्चा झाली होती.

आता पुतळा, छायाचित्र दालन, कॉफी टेबल बुक आणि लघुपटाच्या माध्यमातून अजित पवार यांचा कार्यप्रवास आणि विकासातील योगदान नव्या पिढीसमोर मांडले जाणार आहे.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
