‘ट्रेडमार्कचा इशारा देताच दिग्दर्शकांचा थेट सवाल; २५ कोटींची नोटीस, सेन्सॉरचा पेच अन् २० नोव्हेंबरच्या प्रदर्शनावर टांगती तलवार! रुपाली चाकणकर प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई : नाव, फोटो आणि व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य असलेल्या शैलीचा वापर रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्रेडमार्क नोंदणी केल्याची माहिती दिली आणि ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटाभोवतीचा वाद आणखी चर्चेत आला. पूर्वपरवानगीशिवाय आपली ओळख वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे. तर दुसरीकडे चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी चित्रपट काल्पनिक असल्याचे सांगत विरोधामागे दबाव असल्याचा आरोप केला आहे. या वादामुळे २० नोव्हेंबरला होणाऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.
चाकणकर यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमधून आपल्या नावाची, छायाचित्राची, ओळखीची आणि स्वतःला सादर करण्याच्या विशिष्ट शैलीची ट्रेडमार्क नोंदणी केल्याचे जाहीर केले. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय या गोष्टींचा वैयक्तिक किंवा व्यावसायिक फायद्यासाठी वापर करून फोटो, व्हिडिओ, चित्रपट, रील, टीझर, प्रचारसाहित्य तयार करणे किंवा प्रसिद्ध करणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित साहित्य जप्त करण्याची मागणी करण्यासह दिवाणी आणि फौजदारी कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


या वादाच्या केंद्रस्थानी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा चित्रपट आहे. चित्रपटातील एका व्यक्तिरेखेचे चाकणकर यांच्याशी साधर्म्य असल्याची चर्चा आहे. यावर दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असल्याचे सांगितले. समाजात घडणाऱ्या घटनांपासून प्रेरणा घेऊन सामाजिक संदेश देण्यासाठी चित्रपट तयार केला असून, एखाद्या व्यक्तीशी पात्राचे साम्य आढळणे हा निव्वळ योगायोग असल्याचे त्यांनी म्हटले.

सावंत यांनी चित्रपटाला विरोध होत असल्याचा आरोप करत २५ कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस मिळाल्याचे आणि त्यांच्या कायदेशीर पथकाने त्याला उत्तर दिल्याचे सांगितले. ‘थोरात’ हे नाव चित्रपटातून काढावे, तसेच ‘महाराष्ट्र’ हा शब्द हटवावा, यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींचे फोन येत असल्याचा दावाही त्यांनी केला. चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून त्रास दिला जात असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सेन्सॉर मंडळाच्या प्रक्रियेवरही गंभीर आरोप
चित्रपटाच्या प्रदर्शनासमोर आता सेन्सॉर प्रमाणपत्राचा प्रश्न उभा राहिला आहे. तांत्रिक अडचणीमुळे चित्रपट सादर करण्यास उशीर झाल्याचे सावंत यांनी सांगितले. निर्मात्यांसह सेन्सॉर मंडळाकडे गेल्यानंतर मंत्रालयाकडून दबाव असल्याचे सांगण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच रुपाली चाकणकर गेल्या तीन-चार दिवसांपासून मंडळाच्या कार्यालयात येत असल्याचेही आपल्याला सांगण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. चित्रपटात अश्लील दृश्ये नसून, तो पाहिल्यानंतरच प्रमाणपत्राबाबत निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. स्क्रीनिंगच झाले नसल्याने २० नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता कमी असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
चाकणकरांनी सांगितले ट्रेडमार्क नोंदणीचे कारण
दुसरीकडे, चाकणकर यांनी या नोंदणीमागील भूमिका स्पष्ट केली आहे. काही व्यक्ती आणि संस्था त्यांचे नाव व छायाचित्र वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांच्या छायाचित्रांचा वापर करून अपप्रचार केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. संबंधित चित्रपटाच्या प्रचारासाठी आपल्या नावाचा आणि फोटोचा वापर करून आपल्याशी साधर्म्य असलेल्या पात्राची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करण्यात आल्याने निर्मात्यांना यापूर्वीच कायदेशीर नोटीस पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे चाकणकर यांचा ट्रेडमार्क आणि कायदेशीर कारवाईचा इशारा, तर दुसरीकडे चित्रपट काल्पनिक असल्याचा दिग्दर्शकांचा दावा आणि सेन्सॉर प्रक्रियेबाबतचे आरोप, यामुळे हा वाद चिघळला आहे. २० नोव्हेंबरला चित्रपट पडद्यावर येणार की प्रदर्शन पुढे ढकलले जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
