‘I LOVE YOU मम्मी, पप्पा, दादा…’ अखेरच्या चिठ्ठीतून व्यक्त केलं मनातलं दुःख! NEET मध्ये टॉप टेनमध्ये झेप, KEM मधून डॉक्टर झाला, पण एका निकालाने आयुष्य बदललं

शिरपूर : वैद्यकीय क्षेत्रात मोठं यश मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका २५ वर्षीय तरुण डॉक्टरच्या मृत्यूने धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एमबीबीएसच्या नीट परीक्षेत टॉप टेनमध्ये स्थान मिळवणाऱ्या आणि मुंबईतील नामांकित केईएम रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉ. आयुष चंद्रकांत पवार याने शिरपूरमधील आपल्या राहत्या घरी जीवन संपवलं. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत कुटुंबीयांवरील प्रेम व्यक्त करत आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असं नमूद केलं आहे.

पीजी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत संधी हुकली अन्…
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयुषला वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत १३०० रँक मिळाली होती. मात्र, प्रवेशाच्या पहिल्या फेरीत त्याला अपेक्षित जागा मिळाली नाही. या निकालानंतर तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

११ नोव्हेंबरच्या रात्री आयुष आपल्या भावासोबत घराच्या पहिल्या मजल्यावर झोपला होता. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास कुटुंबीयांच्या लक्षात ही घटना आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

आई-वडील दोघेही शिक्षक; मुलाच्या यशाचा होता अभिमान
आयुषचे वडील चंद्रकांत मुलचंद पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत, तर आई मनीषा एकनाथ पाटील या आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. शिरपूरमधील विद्या विहार कॉलनीत त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. आयुष हा त्यांचा लहान मुलगा होता. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या आयुषने नीट परीक्षेत टॉप टेनमध्ये स्थान मिळवलं होतं. त्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयातून त्याने एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं.
‘माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका’; चिठ्ठीत काय लिहिलं?
आयुषने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका. माझे कुटुंबीय आणि मित्र यांचा मी आभारी आहे. मी माझ्या आयुष्यात अयशस्वी झालोय. आय लव्ह यू मम्मी, पप्पा, दादा,’ अशा आशयाचा मजकूर त्याने लिहिला होता. शेवटी त्याने स्वतःची सहीही केली होती.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. एका हुशार आणि गुणवंत तरुण डॉक्टरच्या अशा अकाली जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिरपूर शहरासह वैद्यकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना स्पर्धा परीक्षा आणि करिअरमधील अपेक्षांचा ताण किती गंभीर असू शकतो, याची जाणीव करून देणारी आहे. एका प्रवेश फेरीतील निकाल म्हणजे आयुष्याचा अंतिम निकाल नसतो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
