मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट? महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांचा बंगला अन् विमानतळाला धमकी; ई-मेलमधील मजकुराने खळबळ!

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाच्या धमकीने सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे. यावेळी धमकी देणाऱ्याने एक-दोन नव्हे, तर शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख केला आहे. मुंबईचे महापौर कार्यालय, बँक, न्यायालय, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा सहा ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी हा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी हा धमकीचा संदेश प्राप्त झाला. यामध्ये नमूद केलेल्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही मुंबई महापौर कार्यालयाला अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल मिळाले होते. गेल्या दोन आठवड्यांपूर्वीही असाच संदेश पाठवण्यात आला होता. आता पुन्हा धमकी आल्याने सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
महापौर कार्यालयात तातडीने तपासणी

धमकीच्या ई-मेलमध्ये महापौर कार्यालयाचा उल्लेख असल्याने मुंबई महानगरपालिका परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने कार्यालयाची कसून तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे कार्यालयातील नियमित कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. तरीही संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.

ई-मेलमध्ये ‘खलिस्तान बोलेगा, मुंबई जिंदाबाद’ असा उल्लेख
या धमकीच्या ई-मेलमध्ये ‘खलिस्तान बोलेगा, मुंबई जिंदाबाद’ असा मजकूर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संदेशामागील व्यक्ती किंवा गट कोणता, याबाबतही तपास यंत्रणा माहिती गोळा करत आहेत. ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्यासाठी कोणते माध्यम वापरण्यात आले आणि धमकी देण्यामागचा उद्देश काय, याचा शोध घेतला जात आहे.
तिसऱ्यांदा धमकी; पोलिसांसमोर आव्हान
महापौर कार्यालयाला याआधीही दोन वेळा अशाच स्वरूपाचे धमकीचे संदेश मिळाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हा प्रकार तिसऱ्यांदा घडल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक वेळी सुरक्षा यंत्रणांना तपासणी करावी लागत असून, यावेळी शहरातील सहा महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख असल्याने अधिक खबरदारी घेतली जात आहे. तपासणीत अद्याप काहीही आक्षेपार्ह आढळले नसले, तरी धमकीचा स्रोत शोधून संबंधितांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.
