नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना! एकाच कुटुंबातील 8 चिमुकल्यांना विषबाधा; एका मुलीचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मोडलगाव येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शेताच्या बांधावर असलेल्या एरंडीच्या झाडाच्या बिया खेळता-खेळता खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तब्बल 8 चिमुकल्यांना विषबाधा झाली.

या दुर्दैवी घटनेत एका चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, एका बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, मोडलगाव येथील या आदिवासी कुटुंबातील आई-वडील पोटापाण्यासाठी आणि रोजगारासाठी अन्य जिल्ह्यात मजुरीसाठी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या लहान मुलांचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या वयोवृद्ध आजी-आजोबांवर होती.

घटनेच्या दिवशी आजी-आजोबा नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी शेतात गेले होते. घरी कोणीही मोठे नसल्याने ही मुले शेताच्या बांधावर खेळत होती. खेळता-खेळता कुतूहलापोटी या चिमुकल्यांनी बांधावरील एरंडीच्या झाडाच्या बिया तोडून खाल्ल्या. काही वेळातच सर्व मुलांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. या बियांमधील विषारी घटकांमुळे मुलांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली.

चिमुकलीचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी तातडीने धाव घेत सर्व आठही बाधित मुलांना धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बाधित बालकांमध्ये पाच मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे.
धडगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले; मात्र, दुर्दैवाने त्यातील एका चिमुरडीची प्राणज्योत मालवली. उर्वरित सात बालकांवर उपचार सुरू असताना त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला तातडीने पुढील आणि अतिदक्षता उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर सहा बालकांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पोटाची खळगी भरण्यासाठी नंदुरबार आणि सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक कुटुंबे दरवर्षी ऊसतोडणी किंवा इतर मजुरीसाठी परजिल्ह्यात स्थलांतरित होतात. मागे राहिलेल्या लहान मुलांचा सांभाळ वृद्ध आजी-आजोबांवर येतो. या घटनेने स्थलांतरित मजुरांच्या पाठीमागे राहणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या देखभालीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
