एका रात्रीसाठी ३० हजार रुपये अन् NRI क्लायंट्सची अट! दिल्लीतील कॉलेजमध्ये तरुणींच्या भरतीचा धक्कादायक प्रकार; NSUI पदाधिकारी निलंबित, NIA चौकशीची मागणी

नवी दिल्ली : दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टच्या नावाखाली तरुणींना पैशांचे आमिष दाखवून अहमदाबादला नेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार दिल्ली विद्यापीठात समोर आला आहे. विशेष म्हणजे, या कथित व्यवहारात तरुणींच्या शरीरयष्टीपासून त्यांच्या दिसण्यापर्यंत निकष ठरवण्यात आल्याचा आरोप आहे. एका रात्रीसाठी १० हजार ते ३० हजार रुपये देण्याची ऑफर आणि अनिवासी भारतीय ग्राहकांसाठी तरुणींची मागणी असल्याचा दावा समोर आल्याने महाविद्यालयीन परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी रामानुजन महाविद्यालयातील अनस खान याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तो बीए हिंदी (ऑनर्स) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असून, महाविद्यालयाने ६ नोव्हेंबर रोजी निलंबनाचे आदेश काढले. त्याचे निलंबन १ फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहणार आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारी, संबंधित विद्यार्थ्याने दिलेले स्पष्टीकरण आणि महाविद्यालयाच्या शिस्तपालन समितीच्या प्राथमिक चौकशीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला.
फ्रेशर्स ग्रुपमधील संदेशाने प्रकरण उघड

एका विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनुसार, महाविद्यालयाच्या नवागत विद्यार्थ्यांच्या गटात दिलजीत दोसांझ यांच्या अहमदाबादमधील कॉन्सर्टसाठी तरुणींना आमंत्रित करणारा संदेश पाठवण्यात आला होता. मात्र, हे आमंत्रण सर्वांसाठी खुले नसल्याचा आरोप आहे. आकर्षक दिसणाऱ्या आणि सुडौल शरीरयष्टी असलेल्या तरुणींना प्राधान्य दिले जाणार असल्याचे कथित संदेशात नमूद होते. एका रात्रीसाठी १० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत मोबदला देण्याची चर्चा होती.

NRI क्लायंट्सचा उल्लेख; नेमकं जाळं कोणाचं?
या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे अनिवासी भारतीय ग्राहकांच्या मनोरंजनासाठी तरुणींची गरज असल्याचा कथित उल्लेख. त्यामुळे हा प्रकार केवळ कॉन्सर्टला जाण्याचे निमंत्रण नसून, त्यामागे आणखी काही वेगळे व्यवहार सुरू होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, या कथित संदेशांमधील दावे आणि त्यामागील संपूर्ण यंत्रणा अद्याप तपासातून सिद्ध झालेली नाही.
एबीव्हीपीची थेट एनआयए चौकशीची मागणी
भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे एखाद्या संघटित टोळीपर्यंत किंवा परदेशातील व्यक्तींपर्यंत पोहोचलेले असू शकतात, अशी शंका संघटनेने व्यक्त केली आहे.
एनएसयूआयचा खुलासा; पदाधिकाऱ्यापासून घेतली फारकत
दुसरीकडे, काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयने अनस खानच्या प्रकरणाशी संघटनेचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित व्यक्तीला यापूर्वीच निलंबित करण्यात आल्याचे सांगत महिला विद्यार्थिनींची सुरक्षितता, सन्मान आणि अधिकार हेच संघटनेचे प्राधान्य असल्याचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी रवी पांडे यांनी म्हटले आहे.
महाविद्यालयाच्या कारवाईनंतर आता या प्रकरणातील कथित आर्थिक आमिषे, विद्यार्थिनींची निवड करण्याचे निकष आणि अनिवासी भारतीय ग्राहकांचा उल्लेख यामागील सत्य काय, याकडे लक्ष लागले आहे. एबीव्हीपीच्या मागणीनंतर एनआयए चौकशी होणार का, हा प्रश्नही चर्चेत आला आहे.
