पाडव्याला पवार कुटुंब बारामतीत पोहोचलं, अजितदादांच्या स्मृतीस्थळी नेमकं काय घडलं? बहिणीच्या अश्रूंनी उपस्थितही गहिवरले!

बारामती : दिवाळी पाडवा म्हटलं की पवार कुटुंबीयांच्या एकत्र येण्याची परंपरा आठवते. मात्र, यंदाच्या पाडव्याला या परंपरेत आनंदापेक्षा आठवणी आणि भावनांचा ओलावा अधिक दिसून आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुलं आणि सुनांसह बारामतीतील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी दादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पण या भेटीदरम्यान घडलेल्या एका प्रसंगाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार, जय पवार आणि त्यांच्या दोन्ही सुना कायनात दारा व ऋतुजा पवार उपस्थित होत्या. याशिवाय विजया पाटील, रजनी इंदुलकर आणि रणजीत पवार यांनीही स्मृतीस्थळी जाऊन अजितदादांना अभिवादन केले. पार्थ आणि जय पवार यांनी वडिलांच्या प्रतिमेला फुले अर्पण केली, तर सुनेत्रा पवार यांनीही श्रद्धांजली वाहिली.
बहिणीला अश्रू अनावर; स्मृतीस्थळी भावूक क्षण

या भेटीतील सर्वाधिक भावूक प्रसंग अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांच्याबाबतीत पाहायला मिळाला. भावाला श्रद्धांजली अर्पण करताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंनी उपस्थितांनाही गहिवरून आले. कुटुंबीयांनी काही काळ स्मृतीस्थळी थांबून अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

पाडव्याच्या परंपरेला यंदा दुःखाची किनार
दिवाळी पाडव्याला पवार कुटुंब एकत्र येण्याची परंपरा जुनी आहे. दरवर्षी या सणाला कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. मात्र, यंदा अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे या भेटीला वेगळीच भावनिक किनार लाभली. सुनेत्रा पवार आणि कायनात दारा स्मृतीस्थळावरून रवाना झाल्या. पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबीयांनी एकत्र येऊन अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिल्याने बारामतीत या भेटीची चर्चा सुरू आहे.
