अजितदादांच्या स्मृतिस्थळी आश्रूंची झालर! पाढव्यादिवशी ‘एक दिप कृतज्ञते’चा म्हणून देशभरात कार्यरत अधिकारी-कर्मचारी लावणार दिवा…..


बारामती : दिवाळी पाडवा म्हटलं की बारामतीकरांच्या पावलांना विद्या प्रतिष्ठानचा रस्ता आपसूकच आठवतो. दरवर्षी या दिवशी अजित पवारांची भेट घेण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कौतुकाची थाप अनुभवण्यासाठी अनेक जण आवर्जून पोहोचत असत. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. अजितदादांच्या निधनानंतरचा हा पहिलाच पाडवा असल्याने त्यांच्या आठवणींनी बारामतीकरांचे मन हेलावले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृतिस्थळी एक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला असून, देशभरात कार्यरत असलेले बारामतीचे अधिकारी-कर्मचारी एकत्र येऊन आपल्या लाडक्या नेत्याला अनोख्या पद्धतीने अभिवादन करणार आहेत.

मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतिस्थळी ‘एक दीप कृतज्ञतेचा’ हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी दिवा प्रज्वलित करून दादांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मार्गदर्शनातून प्रशासकीय सेवेत पोहोचलेल्या अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी हा उपक्रम भावनिक ऋण व्यक्त करण्याची संधी ठरणार आहे.

सामान्य घरातील मुलांना अधिकारी बनवण्यामागे दादांचा हात

बारामती आणि परिसरातील ग्रामीण कुटुंबांमधील तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च पदांवर पोहोचावे, यासाठी अजित पवार यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अद्ययावत सुविधा, अभ्यासिका आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या पाठबळामुळे अनेक तरुण-तरुणींनी वर्ग एक आणि वर्ग दोनच्या शासकीय सेवेत स्थान मिळवले.

निवड झाल्यानंतरही या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी त्यांचे नाते कायम राहिले. त्यांच्या अडचणी समजून घेणे, गरजेच्या वेळी मदतीला धावणे आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, यामुळे अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी कुटुंबप्रमुखासारखी भावना निर्माण झाली होती.

यंदा कौतुकाची थाप नाही, स्मृतिस्थळी कृतज्ञतेचा दीप!

पाडव्याच्या दिवशी दादांना भेटून शुभेच्छा देणे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे हा अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिनक्रमातील खास क्षण असायचा. यंदा मात्र प्रत्यक्ष भेट शक्य नसल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.

‘आपली बारामती, आपली माणसं’ या समूहाने या अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बारामतीत परतलेल्या सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता स्मृतिस्थळी पेटणारा हा दीप अजितदादांनी अनेकांच्या आयुष्यात निर्माण केलेल्या संधी, दिलेले मार्गदर्शन आणि जोडलेली माणसे यांची आठवण करून देणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!