राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा सस्पेन्स संपला? शरद पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टच सांगितलं, मोठी अपडेट..

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही महत्त्वाच्या नेत्यांनी खासदार शरद पवार यांची घेतलेली भेट, तसेच खासदार पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात एकाच दिवशी दोन वेळा झालेल्या बैठका यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सध्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे का?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची शक्यता नसल्याचेही या नेत्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांत नेमकं काय घडलं?

शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी भेट घेतली. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश होता. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
त्यानंतर खासदार पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. एकाच दिवशी झालेल्या दोन भेटींमध्ये दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याचे समोर आले. या बैठकांवेळी शरद पवार यांच्या पक्षातील काही वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. त्यामुळे विलीनीकरणाबाबत काही महत्त्वाच्या हालचाली सुरू असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
सुनील तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांनीही दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचे विधान केले होते. अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी वेग आला.
याआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचीही चर्चा होती. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते.
मात्र, आता शरद पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीच सध्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केल्याने या विषयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या राजकीय वाटचालीबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
