फोटो काढताना माकडाने बॅग हिसकावली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! नागपूरच्या शिक्षकाचा पचमढीच्या १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

नागपूर : पर्यटनासाठी गेलेल्या नागपूरच्या एका शिक्षकाचा मध्य प्रदेशातील पचमढी येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असताना एका माकडाने त्यांची बॅग हिसकावली. ती परत मिळवण्याच्या प्रयत्नात शिक्षकाचा तोल गेला आणि ते थेट सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. विजय नायक असं मृत शिक्षकाचं नाव असून, त्यांच्या निधनामुळे नागपूरमधील शैक्षणिक वर्तुळासह कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय नायक हे नागपूरच्या रामदासपेठ परिसरातील सोमलवार शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते ४० वर्षांचे होते. गुरुवारी सायंकाळी ते पर्यटकांच्या एका गटासोबत नागपूरहून पचमढी येथे पोहोचले होते. शुक्रवारी हा गट तेथील प्रसिद्ध प्रियदर्शनी पॉइंटवर फिरण्यासाठी गेला होता. पर्यटनस्थळावरील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेत असताना फोटो काढण्याची तयारी सुरू होती. त्याचवेळी अचानक एका माकडाने विजय यांची बॅग हिसकावून घेतली.
बॅग परत मिळवण्यासाठी विजय यांनी माकडाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या धावपळीत त्यांचा पाय घसरला. पायाखालचा तोल गेल्याने ते स्वतःला सावरू शकले नाहीत आणि खोल दरीत कोसळले. सुमारे १५० फूट खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी आनंदाने पर्यटनाचा अनुभव घेणाऱ्या सहकाऱ्यांसाठी हा प्रसंग मोठा धक्का ठरला.

घटनेची माहिती मिळताच पचमढी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दरीतून विजय नायक यांचा मृतदेह बाहेर काढला. आवश्यक प्रक्रिया आणि शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नागपूरला रवाना करण्यात आला.

विजय नायक यांच्या पश्चात दोन मुली आहेत. कुटुंबासोबतच त्यांच्या सहकारी शिक्षकांनाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. पर्यटनस्थळावरील एका अनपेक्षित प्रसंगामुळे हसतखेळत सुरू झालेली सहल एका कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना देणारी ठरली आहे.
