पार्थ पवार अचानक शरद पवारांच्या भेटीला; सिल्व्हर ओकवर राजकीय हालचालींना वेग..

मुंबई : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पार्थ पवार दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्यातच आता पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, शशिकांत शिंदे यांच्यासह अन्य महत्त्वाचे नेतेही उपस्थित आहेत. त्यामुळे या भेटीमागे नेमके काय कारण आहे आणि राजकीयदृष्ट्या कोणती चर्चा होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवार यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कफाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पार्थ पवार हे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटीला गेल्याचे सांगितले जात आहे.
सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत काय म्हटले होते?
अजित पवार हयात असते, तर आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असत्या. तसेच दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती, असे विधान सुनील तटकरे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली.
दरम्यान, या विधानानंतर तटकरे यांनी पुन्हा भूमिका स्पष्ट करत विलिनीकरणाचा विषय संपलेला असून याबाबत सध्या कोणतीही चर्चा नसल्याचे सांगितले. मात्र, पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे या भेटीतून कोणते नवे राजकीय संकेत मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
