राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, ‘निर्णय घेताना आम्हाला…’


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सांगतानाच, अजित पवार असते तर 12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झाले असते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला होता. अजित पवार यांनी याबाबत आपल्याला कल्पना दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या चर्चांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र पक्ष असून विलिनीकरणाचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. मात्र, असा काही निर्णय घेतल्यास एनडीएतील मोठा घटक पक्ष म्हणून त्यांना आम्हाला विश्वासात घ्यावे लागेल, असे विधान फडणवीस यांनी केले आहे.

विलिनीकरणाचा निर्णय त्यांनीच घ्यावा; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे दोन्ही स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांच्या पक्षातील नेते एकत्रितपणे याबाबत निर्णय घेतील. शरद पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यासारखे नेते या पक्षांमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत निर्णयांवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, कोणताही निर्णय घेताना ते आम्हाला विश्वासात घेतील. कारण एनडीए युतीमध्ये आम्ही मोठे भागीदार आहोत. सध्या तरी या विषयावर आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांच्यात चर्चा सुरू असेल आणि ते आम्हाला विचारतील, तेव्हा आम्ही आमची भूमिका मांडू.

प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला.

त्यातच सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या इच्छेबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना आणखी चालना मिळाली आहे. आता या संपूर्ण घडामोडींवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते काय भूमिका घेतात आणि विलिनीकरणाबाबत पुढे काही निर्णय होतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!