तुकाराम मुंढेंच्या FDA ची दिवाळीत राज्यभर धडक कारवाई! Zepto-Blinkitसह 105 दुकानांवर कारवाई, परवानेही निलंबित

पुणे : दिवाळीच्या सणात मिठाई, फरसाण आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढलेली असताना अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावरून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली.

या मोहिमेत शंभरहून अधिक दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईच्या कक्षेत Zepto आणि Blinkit यांसारख्या क्विक कॉमर्स कंपन्यांचाही समावेश आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईची राज्यभर चर्चा सुरू आहे.
Zepto आणि Blinkit वरही FDA ची कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली. यावेळी मुंबईतील 28 दुकानांवर कारवाई करण्यात आली. यात क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto आणि Blinkit यांचाही समावेश होता.

मुंबईसह पुणे, अमरावती आणि कोकण विभागातील विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. मुंबईतील बोरिवली परिसरातील एका बिर्याणी सेंटरवरही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
भंडाऱ्यात 8.59 लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त
भंडारा जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान तब्बल 8 लाख 59 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 9 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 68 पेढ्यांच्या दुकानांना नोटिसा बजावण्यात आल्या.
अन्नभेसळ करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, 44 पेढ्यांच्या दुकानांना सुमारे 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नाशिकमध्ये केस उगवण्याचा दावा करणाऱ्या संस्थेवर छापा
नाशिकमध्ये टक्कल असलेल्या व्यक्तींच्या डोक्यावर पुन्हा केस उगवण्याचा दावा करणाऱ्या संस्थेचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेज रोड परिसरातील व्हीएस न्यू फॅशन झोनवर FDA च्या औषध विभागाने कारवाई केली.
सोशल मीडियावर टक्कल असलेल्या व्यक्तींना हमखास केस येतील, असे दावे करणारे व्हिडिओ प्रसारित केले जात होते. मात्र, तपासणीत विनापरवाना औषधनिर्मिती आणि बेकायदेशीर सर्जरीचा प्रकार समोर आला. कोणताही वैद्यकीय परवाना नसताना तीळ आणि चामखीळ काढण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचेही आढळले.
या कारवाईत सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच बनावट हेअर ऑइलचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये निकृष्ट मोतीचूर लाडूंचा साठा जप्त
नाशिकमध्ये मिठाई आणि फरसाण दुकानांवरील कारवाईनंतर आता निकृष्ट दर्जाच्या मोतीचूर लाडूंवरही FDA ने कारवाई केली आहे. सण-उत्सव विशेष मोहीम 2026 अंतर्गत श्री बालाजी लाडू या आस्थापनेची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अस्वच्छ वातावरणात लाडू तयार केले जात असल्याचे आढळले. तसेच मोतीचूर लाडूंमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक अन्नरंग वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी 64 हजार 500 रुपये किमतीचा तब्बल 258 किलो लाडूंचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्रही तात्काळ निलंबित करण्यात आले.
सणासुदीच्या काळात अन्न सुरक्षेवर प्रशासनाचे लक्ष
दिवाळीच्या काळात मिठाई, फरसाण आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. अशा परिस्थितीत अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता आणि नियमांचे पालन यावर FDA कडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. राज्यभरातील या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
