अमेरिकेत बसून बॉलिवूडमध्ये दहशत माजवणारा हॅरी बॉक्सर अखेर जाळ्यात! रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारापासून रणवीर सिंहच्या २० कोटींच्या खंडणीपर्यंत; बिश्नोई टोळीचे धागेदोरे उघड होणार?

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या देणे, खंडणीची मागणी करणे आणि गोळीबाराच्या घटनांमुळे चर्चेत आलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीला मोठा धक्का बसला आहे. या टोळीशी संबंधित प्रमुख गुंड हॅरी बॉक्सर याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिलेल्या माहितीच्या आधारे अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमा शुल्क अंमलबजावणी यंत्रणेने कॅलिफोर्नियात ही कारवाई केली. त्याच्या ताब्यात घेतल्यामुळे बॉलिवूडमधील कलाकारांना दिलेल्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटनांच्या तपासाला नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

हॅरी बॉक्सरचे मूळ नाव हरिचंद जाट असल्याचे सांगितले जाते. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सक्रिय आणि महत्त्वाचा सदस्य असल्याची माहिती आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर १ फेब्रुवारी २०२६ रोजी गोळीबार झाला होता. या घटनेची जबाबदारी हॅरी बॉक्सरने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर समाजमाध्यमांवरील पोस्ट आणि ध्वनिमुद्रित संदेशांच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमधील अनेकांना धमक्या दिल्याचेही समोर आले होते. रोहित शेट्टीच्या टीमलाही धमकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
अभिनेता रणवीर सिंह याच्याकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही हॅरी बॉक्सरवर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर या धमकी आणि खंडणी प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संपर्क आणि टोळीतील इतर सदस्यांची माहिती तपास यंत्रणांना मिळू शकते. अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याशी किंवा इतर कलाकारांना मिळालेल्या धमक्यांशी त्याचा काही संबंध आहे का, याचाही तपासात उलगडा होण्याची शक्यता आहे.

हॅरी बॉक्सरविरोधात राजस्थान, पंजाब आणि दिल्लीमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. खून, खंडणी व धमकावणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव समोर आले आहे. कॅनडामध्ये अभिनेता कपिल शर्मा यांच्या कॅफेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमागेही त्याचा हात असल्याचा आरोप आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अमेरिकेतील यंत्रणांना हॅरी बॉक्सरबाबत माहिती दिल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. आता त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याला भारतात आणण्याबाबत काय पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे. त्याच्या चौकशीतून लॉरेन्स बिश्नोई टोळीचे परदेशातील जाळे, कलाकारांना दिलेल्या धमक्यांचे नियोजन आणि खंडणीच्या व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. मात्र, या सर्व प्रकरणांतील आरोपांची चौकशीतून पडताळणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
