मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये मदत देण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द खरा; राज्यातील ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत…


मुंबई : राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार ५ नोव्हेंबर २०२६ अखेर राज्यातील ८७ लाख ४५ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ३७२ कोटी ८३ लाख रुपयांची दिवाळी अग्रीम मदत वितरित झाली आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दिवाळी अग्रीम मदतीचा निर्णय घेतला. महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदत वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबववून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यावर भर देण्यात आला. या मदतीमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.

तांत्रिक अडचणी दूर करून उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत

काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते तपशीलातील त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम जमा होण्यास विलंब झाला आहे. अशा शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करून त्यांना अग्रीम मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, दिवाळी अग्रीम मदतीच्या वितरणावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत मिळणार असल्याचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!