लग्नात २५ लाख खर्चूनही पैशांचा हव्यास संपेना! हुंड्यासाठी छळ, गर्भपाताचा आरोप अन् घटस्फोटाआधीच पतीचं दुसरं लग्न; वडकीत खळबळ


पुणे : लग्नात माहेरच्या मंडळींनी २५ लाख रुपये खर्च केले, सोन्याचे दागिने आणि भरभरून मानपानही केला; मात्र सासरच्या मंडळींची पैशांची मागणी काही थांबली नाही. माहेरून आणखी १० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ, स्त्रीत्वावर संशय घेऊन अपमान, मारहाण आणि गर्भपातासाठी दबाव आणल्याचा गंभीर प्रकार वडकी (ता. हवेली) येथे समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटस्फोटासाठी ७० लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले; त्यातील २१ लाख रुपये दिल्यानंतर पतीने घटस्फोट होण्याआधीच दुसरे लग्न केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी २४ वर्षीय तेजश्री यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पती ऋषिकेश अभिमान वायबसे, सासू रुक्मिणी वायबसे, सासरे अभिमान वायबसे, नणंद विद्या बिक्कड, दीर श्रीकांत वायबसे आणि विवाह जमविणारे मध्यस्थ वालचंद मुंडे अशा सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तेजश्री यांचा विवाह ६ जून २०२५ रोजी लातूर येथील ऋषिकेश यांच्याशी झाला. लग्नासाठी माहेरच्यांनी १५ लाख रुपये वरदक्षिणा, एक तोळ्याची सोन्याची अंगठी आणि लग्नाचे साहित्य व खर्चासाठी १० लाख रुपये असे एकूण २५ लाख रुपये खर्च केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरुवातीचा महिना चांगला गेल्यानंतर सासू आणि नणंदेकडून आर्थिक परिस्थितीवरून टोमणे मारले जाऊ लागले. लग्नात अपेक्षित मानपान केला नसल्याचे सांगून अपमानित केल्याचा आरोप आहे.

पतीच्या छपाई व्यवसायासाठी माहेरून आणखी १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचे तेजश्री यांनी तक्रारीत नमूद केले आहे. नणंदेने त्यांच्या स्त्रीत्वावर संशय घेत डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले आणि त्या महिला नसल्याचे आरोप करून मानसिक त्रास दिल्याचाही दावा आहे.

ऑक्टोबर २०२५ मध्ये तेजश्री गर्भवती असल्याचे समजल्यानंतर त्यांना मूल होऊ देणार नसल्याचे सांगून घराबाहेर काढल्याचा आरोप आहे. ६ डिसेंबर २०२५ रोजी दागिने काढून घेत घरातून हाकलून दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर माहेरी केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्या महिला असून तीन महिन्यांच्या गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला.

घटस्फोटाआधी दुसरे लग्न; उर्वरित ४९ लाख रुपयेही थकवले?

पुढे घटस्फोटाच्या बदल्यात ७० लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यासाठी आधी गर्भपात करण्याची अट घालण्यात आल्याचा आरोप आहे. हडपसर येथील रुग्णालयात गर्भपात करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. २२ जुलै २०२६ रोजी घटस्फोटाच्या बाँडवर स्वाक्षरी घेतल्यानंतर तेजश्री यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात २१ लाख रुपये जमा करण्यात आले. मात्र, घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच पतीने दुसरे लग्न केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उर्वरित ४९ लाख रुपये देण्यास नकार देत धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२ आणि ८५ अन्वये सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यापासून ते गर्भपात आणि दुसऱ्या लग्नापर्यंतच्या गंभीर आरोपांमुळे वडकी परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!