रुग्णवाहिका दारात आली अन् एका कॉलरने उघडलं भावाच्या हत्येचं रहस्य! नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचणाऱ्या मोठ्या भावाचा भयानक कारनामा उघड

नवी मुंबई : सख्ख्या भावानेच धाकट्या भावाचा गळा आवळून जीव घेतला आणि त्यानंतर संपूर्ण घटनेवर पडदा टाकण्यासाठी नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला. मात्र, मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताना घडलेल्या एका छोट्याशा प्रकाराने आरोपीचा डाव उधळला. शर्टची कॉलर सरकताच गळ्यावरील व्रण शेजाऱ्यांच्या नजरेस पडले आणि एका भयानक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. नवी मुंबईतील खांदा कॉलनीमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव रोहन भगवान सणस (४०) असून, हत्या केल्याचा आरोप त्याचा मोठा भाऊ राहुल भगवान सणस (४५) याच्यावर आहे. दोघेही खांदा कॉलनीतील सेक्टर ७ मधील ओम वैभव सहकारी सोसायटीत राहत होते. रोहन मागील काही काळापासून गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याच्या उपचारांसाठी होणारा खर्च आणि घरातील वारंवार होणारे वाद यामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण झाले होते. याच परिस्थितीमुळे राहुलची पत्नी आणि मुले मागील सहा महिन्यांपासून गावाला गेली होती.
४ नोव्हेंबर रोजी दुपारी साधारण तीन वाजता रोहनचा मृत्यू झाल्याचे राहुलने सांगितले. झोपेतच नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवून त्याने मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्याच्या वेळी शर्टची कॉलर बाजूला झाली. त्यावेळी रोहनच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसल्या. हा प्रकार पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने खांदेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय चव्हाण आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाकडूनही तपास करण्यात आला. घराच्या पहिल्या मजल्यावरील बीमला नायलॉनची दोरी लटकलेली आढळली. त्यानंतर शवविच्छेदन अहवालातून रोहनचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या चौकशीत अखेर सत्य बाहेर
राहुलच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. अखेर चौकशीत त्याने आजारपण आणि उपचारांच्या खर्चामुळे निर्माण झालेल्या त्रासाला कंटाळून नायलॉनच्या दोरीने भावाचा गळा आवळल्याची कबुली दिली. खांदेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयाने राहुलला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका शर्टच्या कॉलरमुळे नैसर्गिक मृत्यूचा बनाव उघडकीस आल्याने या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
