गोकुळच्या अध्यक्षपदावरून राजकीय हालचालींना वेग; हसन मुश्रीफांची सतेज पाटलांना थेट ऑफर, म्हणाले…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला 14 संचालकांचा कोरम पूर्ण होत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. अशातच शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयामुळे अध्यक्षपदाच्या समीकरणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांना थेट ऑफर दिली आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी सतेज पाटील यांनी आम्हाला फॉर्म्युला द्यावा, आम्ही त्यांना रोखलेले नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्यामुळे सतेज पाटील आता कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच नेमका काय?
गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळात एकूण 25 जागा आहेत. यापैकी समविचारी आघाडीकडे 13, तर महायुतीकडे 12 संचालक आहेत. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी 14 संचालकांचा कोरम आवश्यक असल्याने दोन्ही बाजूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याबाबत बोलताना हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, कायद्यानुसार अध्यक्ष निवडीसाठी 14 संचालकांचा कोरम आवश्यक आहे. आमच्याकडे 12 संचालक असल्याने आणखी दोघांची गरज आहे. बहुमत त्यांना मिळाले असले तरी तेही आवश्यक 14 चा आकडा गाठू शकले नाहीत. हा पेच सोडवण्यासाठी शासनाने पाच शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

शासननियुक्त संचालकांच्या मतदानामुळे समीकरण बदलणार?
गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यापैकी चार अशासकीय सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या चार सदस्यांना अध्यक्ष निवडीमध्ये मतदानाचा अधिकार मिळाल्यास महायुतीला आवश्यक संख्याबळ मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे समविचारी आघाडीच्या हातातून अध्यक्षपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काय दिला होता सल्ला?
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात वकील अॅड. श्रीकृष्ण गणबावले यांनी महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. गोकुळमधील सत्तांतर रोखण्यासाठी अध्यादेश आणल्यास तो बेकायदेशीर ठरू शकतो, असा सल्ला माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिला होता, असे गणबावले यांनी सांगितले.
स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही, अशी आठवणही त्यांनी करून दिली होती. तसेच असा अध्यादेश काढणे हा मनमानी कारभार ठरू शकतो, असा इशाराही माजी सरन्यायाधीशांनी दिल्याचे गणबावले यांनी स्पष्ट केले.
आता हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना दिलेली ऑफर, शासननियुक्त संचालकांचा मतदानाचा अधिकार आणि अध्यक्षपदासाठी सुरू असलेली रस्सीखेच यामुळे गोकुळमधील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
