पुणे विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाची बॅग उघडताच अधिकारीही चक्रावले; नूडल्सच्या पाकिटांत काय सापडलं?

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका भारतीय प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता नूडल्स आणि सुकामेव्याच्या पाकिटांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल 3 कोटी 72 लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा आढळला. या प्रकरणी संबंधित प्रवाशाला कस्टम विभागाने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय घडलं?
ही घटना 4 नोव्हेंबर रोजी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-291 या विमानाने बँकॉकहून एक भारतीय प्रवासी पुण्यात दाखल झाला होता. विमानतळावर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याच्या सामानाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी त्याच्या ट्रॉली बॅगेत नूडल्सची पाकिटे आणि ‘फ्रीज ड्राय मंथोंग ड्युरियन’ नावाने असलेली सुकामेव्याची नऊ पाकिटे आढळली. सुरुवातीला ही सामान्य खाद्यपदार्थांची पाकिटे असल्याचे वाटत होते. मात्र, अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी सखोल तपासणी केली.

पाकिटांमध्ये आढळला कोट्यवधींचा गांजा
तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये काळ्या प्लास्टिकचे दोन थर आणि त्यात व्हॅक्यूम सील केलेल्या पिशव्या आढळल्या. या पिशव्यांमध्ये पिवळसर-हिरव्या रंगाच्या वाळलेल्या फुलांच्या कळ्या होत्या. त्यानंतर कस्टम विभागाने अमली पदार्थ तपासणी किटच्या साहाय्याने चाचणी केली. त्यात हा पदार्थ हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत अधिकाऱ्यांनी एकूण 10.642 किलो गांजा आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेले पॅकिंग साहित्य जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत तब्बल 3 कोटी 72 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रवाशाला अटक, 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
या प्रकरणी संबंधित भारतीय प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कस्टम विभागाचे पोलीस उपायुक्त धीरज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुणे विमानतळावर खाद्यपदार्थांच्या पाकिटांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
