दिवाळीच्या मिठाईवर FDA ची धडक कारवाई! पुण्यात १० ठिकाणी छापे; कराची स्वीट मार्टचा परवाना निलंबित…


पुणे : दिवाळीचा सण जवळ येत असताना मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात धडक कारवाई केली आहे.

जिल्ह्यातील विविध १० ठिकाणी मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री व उत्पादन केंद्रांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत तब्बल ९ लाख ३९ हजार रुपये किमतीचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये सुमारे दीड हजार किलो निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा समावेश असून, हा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे.

कराची स्वीट मार्टचा परवाना निलंबित

पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध ‘मे. कराची स्वीट मार्ट’वरही FDA ने कारवाई केली. या दुकानातून ९० हजार रुपये किमतीचे १८६ किलो मोतीचूर लाडू, खवा आणि मलाई पेढा जप्त करून नष्ट करण्यात आला.

तपासणीदरम्यान मिठाईमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आणि अनधिकृत सिंथेटिक रंगांचा वापर होत असल्याचे आढळले. तसेच खवा खरेदीच्या नोंदी उपलब्ध नसणे, तापमान नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन आणि कालबाह्य चोको स्टिक्सचा वापर केल्याचेही समोर आले. या गंभीर त्रुटींमुळे प्रशासनाने दुकानाचा परवाना निलंबित केला आहे.

पुणे जिल्ह्यात कुठे-कुठे झाली कारवाई?

FDA च्या पथकाने जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तपासणी करून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ जप्त केले.
– मुळशी (मान) : ‘मे. चामुंडा माँ रबडीवाला’ येथून अयोग्य साठवणुकीमुळे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची ४८६ किलो रबडी आणि रसगुल्ले जप्त करण्यात आले.
– खेड (शिरोली) : ‘मे. अंबिका फूड्स’ या उत्पादन केंद्रातून १ लाख ६२ हजार रुपये किमतीची ६४८ किलो सोनपापडी जप्त करण्यात आली. याशिवाय केंद्राचा परवानाही निलंबित करण्यात आला.
– शिक्रापूर : ‘मे. श्री गणेश लाडूवाले’ यांच्याकडून परवान्याशिवाय आणि अस्वच्छ वातावरणात तयार केलेले १ लाख २५ हजार रुपये किमतीचे ६०५ किलो लाडू आणि म्हैसूर पाक जप्त करण्यात आले.
– मोहम्मदवाडी : ‘मे. बिकानेर मिठाईवाले’ येथून ८८ हजार रुपये किमतीची २६८ किलो बर्फी जप्त करून नष्ट करण्यात आली.
– मंचर : ‘मे. राजमिलन स्वीट्स’ येथून ८० हजार रुपये किमतीचा २५० किलो मावा नष्ट करण्यात आला.
– शिवाजीनगर : ‘मे. न्यू क्वालिटी डेअरी फार्म’ येथून ३१ हजार रुपये किमतीचे १०४ किलो दही, क्रीम, दूध आणि पनीर जप्त करण्यात आले.
– वानवडी आणि मुंढवा : ‘मे. पौर्णिमा स्वीट्स’ येथून ५८ किलो कलाकंद जप्त करण्यात आला. तर ‘मे. जनता स्वीट्स’कडे वैध परवाना नसल्याने दुकान बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.
– पिंपळे सौदागर आणि काळेवाडी : ‘मे. भायल स्वीट्स’ आणि ‘मे. पुणेरी स्वीट्स’ येथून अनुक्रमे १२.५ किलो आणि ३५ किलो निकृष्ट अन्नपदार्थांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.

दिवाळीच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, यासाठी FDA कडून तपासणी आणि कारवाईची मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नागरिकांनीही स्वच्छता, दर्जा आणि उत्पादनाची माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!