प्रेमविवाह केला, संसाराची स्वप्नं पाहिली; पण घर बांधण्यासाठी पैशांचा तगादा जीवावर बेतला! पूजाच्या मृत्यूने सांगली हादरली, पतीसह सासू-सासरे अटकेत


सांगली : प्रेमविवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या २४ वर्षीय पूजाचा संसार अवघ्या काही वर्षांत दुःखद वळणावर पोहोचला. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून होणारा कथित छळ, लग्नात योग्य मानपान न केल्याची तक्रार आणि नवीन घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा दबाव यामुळे पूजा त्रस्त होती. अखेर या त्रासातून तिने स्वतःला पेटवून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्याला अटक केली असून शिराळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

प्रेमविवाहानंतर काही दिवसांतच छळ सुरू झाल्याचा आरोप

पूजा शिवम पाटील (वय २४) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पाडळी येथील रहिवासी होती. पूजाने शिवम सुरेश पाटील याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर सुखाचा संसार करण्याचे तिचे स्वप्न लवकरच अडचणीत आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून २०२३ पासूनच सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप आहे.

लग्नात माहेरच्यांनी योग्य मानपान केला नाही, अशी नाराजी व्यक्त केली जात होती. याशिवाय नवीन घर बांधण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, असा दबाव पूजावर टाकण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सततच्या मागण्या आणि कथित मानसिक त्रासामुळे ती अडचणीत असल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

२२ सप्टेंबरला घडली दुर्दैवी घटना

२२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पूजाने राहत्या घरी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेत ती गंभीररीत्या भाजली. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने पाडळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वडिलांच्या तक्रारीनंतर तिघांना अटक

पूजाचे वडील रवींद्र शामराव शिंदे (वय ५७, रा. शिराळा) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पूजाचा पती शिवम सुरेश पाटील, सासू सुमित्रा सुरेश पाटील आणि सासरे सुरेश खंदू पाटील यांना अटक केली. या तिघांविरोधात तक्रारीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पुण्यातील पायल झांबरे प्रकरणाचीही चर्चा

दरम्यान, पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील पायल झांबरे यांच्या मृत्यूची घटनाही चर्चेत आहे. दिवाळीसाठी माहेरून दहा तोळे सोने आणण्याच्या मागणीवरून त्यांचा सासरी छळ होत असल्याचा आरोप आहे. पायल यांनी मृत्यूपूर्वी रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी भाऊ ऋषिकेश याला संदेश पाठवला होता. त्यात त्यांनी सासूला जबाबदार धरल्याचे नमूद केले होते. भावाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पायल यांनी फोन उचलला नाही. पतीशी संपर्क साधल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देत ‘घरच्या भांडणात पडू नका’ असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

सांगलीतील पूजा आणि पुण्यातील पायल यांच्या मृत्यूच्या घटनांमुळे विवाहित महिलांवरील कथित सासरच्या छळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, पूजाच्या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!