जिल्हा परिषद निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस; तिन्ही पक्षांच्या स्वबळाच्या तयारीने राजकीय चर्चा रंगल्या!

नंदूरबार : नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये राजकीय मतभेद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे घटक पक्षच एकमेकांविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीतील तिन्ही पक्षांची स्वबळाची तयारी
नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपकडून सत्ताकाळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू आहे. तर शिवसेनेकडून भाजपच्या कामांचा लेखाजोखा मांडण्याची भूमिका घेतली जात आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेत स्वतंत्र ताकद दाखवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विरोधकांपेक्षा महायुतीतील मित्रपक्षांचेच आव्हान मोठे ठरण्याची शक्यता आहे.

तिन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असले, तरी जिल्हा परिषदेत किंगमेकर ठरण्याचा विश्वासही प्रत्येक पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती एकत्र राहणार की स्वतंत्रपणे लढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुतीतील या संभाव्य फुटीचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला होणार, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे नंदुरबारमध्ये ऊस दराचा मुद्दाही चांगलाच पेटला आहे. ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, कारखानदारांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरली आहे.
नंदुरबारचे प्रांताधिकारी बंडू कापसे यांच्या उपस्थितीत ऊस दरासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी प्रतिटन ३ हजार ६५० रुपये दर देण्याची मागणी केली. मात्र, कारखानदारांकडून प्रतिटन ३ हजार २५० ते ३ हजार ३०५ रुपयांपर्यंत दर देण्याची भूमिका मांडण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दर मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी नंदुरबारमधील कारखान्यांना एकही ऊस न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत कारखानदारांनी दराबाबत योग्य निर्णय घेतला नाही, तर गुजरात राज्यात जाऊन ऊस विक्री करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
त्यामुळे नंदुरबारमध्ये आगामी काळात ऊस दराचा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता आहे. आता कारखानदार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
