अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! चार वर्षांनंतरही संधी संपणार नाही; ७५ टक्के जवानांना दोन वर्षांची मुदतवाढ, पुढे नियमित नोकरीचा मार्ग खुला?

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अग्निवीर योजनेत मोठा बदल करण्यात आला असून, चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडण्याची वेळ येणाऱ्या ७५ टक्के अग्निवीरांना आता आणखी दोन वर्षे सैन्य दलात काम करण्याची संधी मिळणार आहे. या अतिरिक्त सेवेनंतर नियमित सैन्य सेवेत जाण्याचा मार्गही त्यांच्यासाठी खुला होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अग्निवीरांच्या भवितव्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत अग्निवीर योजनेतील नव्या तरतुदींची माहिती देण्यात आली. सैन्य दलांच्या शिफारशी, अग्निवीरांकडून मिळालेला अभिप्राय आणि तरुणांच्या अपेक्षा लक्षात घेऊन हा बदल केल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी अग्निवीर योजनेनुसार चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या जवानांपैकी केवळ २५ टक्के जणांना नियमित सैन्य सेवेत निवडले जाण्याची संधी होती. उर्वरित ७५ टक्के तरुणांना चार वर्षांनंतर सेवा सोडावी लागत होती. मात्र, आता या व्यवस्थेत बदल करून त्या ७५ टक्के अग्निवीरांना आणखी दोन वर्षांचा सेवाकाल देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या अतिरिक्त दोन वर्षांच्या काळात त्यांच्या वेतनातही बदल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, दोन वर्षांची अतिरिक्त सेवा पूर्ण केल्यानंतर या जवानांना नियमित सैन्य सेवेसाठी निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मात्र, यासाठी अग्निवीरांची स्वतःची इच्छा असणे आणि सैन्य दलाने निश्चित केलेल्या पात्रता व निवड निकषांची पूर्तता करणे आवश्यक असेल. त्यामुळे दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली म्हणजे सर्वांची कायमस्वरूपी नियुक्ती निश्चित झाली, असे समजता येणार नाही.

सरकारच्या मते, या निर्णयातून अग्निवीरांच्या करिअरविषयक अपेक्षा आणि सैन्य दलांची मनुष्यबळाची गरज यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. अग्निवीर भरती देशातील विविध जिल्ह्यांमध्ये पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली आहे. या प्रशिक्षणातून तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, मनोबल, स्पर्धात्मक वृत्ती, तांत्रिक कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित होत असल्याचेही सरकारने नमूद केले.
या योजनेत महिलांनाही सैन्य दलातील विविध विभागांमध्ये संधी मिळत आहे. आता ७५ टक्के अग्निवीरांसाठी दोन वर्षांच्या अतिरिक्त सेवेचा पर्याय उपलब्ध झाल्याने तरुणांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार, वाढीव सेवेदरम्यानचे वेतन किती असेल आणि नियमित सेवेसाठी निवडीचे निकष काय असतील, याबाबत अधिक तपशीलाकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
